अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन

भारतात जातिव्यवस्था खूप खोलवर रुतली आहे. जोपर्यंत या जातिव्यवस्थेचा अंत होत नाही. तोपर्यंत भारताचे महासत्तेचे स्वप्न धूसर आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी येथे केले.

शिवसेना महानगरतर्फे आचार्य अत्रे रंगमंदिरात करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्य डॉ. नरेश चंद्र, महापौर राजेंद्र देवळेकर, शहरप्रमुख विजय साळवी उपस्थित होते.

माजी महापौर रमेश जाधव यांच्या कार्यकाळात पालिकेने स्पर्धा परीक्षांसाठी दिवंगत खा. प्रकाश परांजपे यांच्या नावाने सुरू केलेले प्रशिक्षण केंद्र अद्याप आकाराला आले नसल्याने धर्माधिकारी यांनी खेद व्यक्त केला. ज्याच्याकडे बुद्धी आहे, त्याचा मत्सर करण्याची किंवा मला काय येत नाही म्हणून त्याचा न्यूनगंड बाळगण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे प्रगतीचे पाऊल टाकावे. करिअर ही काही जातिव्यवस्था नाही. करिअर क्षेत्रात प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे पुढे जात असतो. निवडलेल्या क्षेत्रात उत्तम काम करणे आणि प्रतिभावान असणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. भारत देशाला जातिव्यवस्थेचा मोठा शाप आहे. प्रगतीच्या वाटेवर चालताना काही वेळा आपण नाहक या व्यवस्थेत अडकून पडतो. जेव्हा जातिव्यवस्थेचा अंत होईल, तेव्हा काही तासात भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपला देश सुजलाम् सुफलाम् आहे. मग वारंवार येणारी दुष्काळाची संकटे दूर करण्यासाठी वनीकरण, पाणी अडविण्याचे उपक्रम मोठय़ा प्रमाणात हाती घेतले जात नाहीत. केवळ मोहीम म्हणून वनीकरणाचे कार्यक्रम ठीक. पण कायमस्वरूपी बदल घडविण्यासाठी आपण आपल्या कृतीत सातत्य ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.