News Flash

कल्याणमधील दोन मंगल कार्यालयांना टाळे

दोन्ही मंगल कार्यालयांच्या चालकांना शिक्षा म्हणून ही कार्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत.

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णसंख्या दोन हजार रुग्णसंख्येकडे वाटचाल करीत आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका, पोलिसांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत काही मंगल कार्यालय चालक, विवाह सोहळ्यांचे आयोजक शासनाचे आदेश न पाळता गर्दी जमवून कार्यक्रम करीत असल्याने अशी मंगल कार्यालये आणि आयोजकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी कल्याणमधील भवानी आणि वैष्णवी ही दोन मंगल कार्यालये मंगळवारी टाळे ठोकून बंद केली.

या दोन्ही मंगल कार्यालयांच्या चालकांना शिक्षा म्हणून ही कार्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत. याशिवाय, कल्याण-शिळ फाटा रस्त्यावरील कोळेगाव येथे सेंट मेरी शाळेजवळ मोकळ्या जागेत १५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या वधू-वरांचे वडील नामदेव सखाराम पाटील (रा. नांदिवली), शंकर जोशी (रा. चिंचपाडा) यांच्याविरुद्ध ई प्रभाग अधिकारी भारत पवार, मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. पी. वणवे यांनी गुन्हे दाखल केले आहेत.

गेल्या शनिवारी भवानी आणि वैष्णवी मंगल कार्यालयांमध्ये व्यवस्थापक रमेश लक्ष्मण सिंग यांनी दोन विवाह सोहळ्यांची नोंदणी केली होती. पोलिसांनी सिंग यांना मंगल कार्यालयात ५० जणांच्या वर एकही वऱ्हाडी असता कामा नये अशी तंबी दिली होती. तरी या मंगल कार्यालयांमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले, नगरसेविका शालिनी वायले आणि सुरेश गंगाराम म्हात्रे (रा. डोंबिवली) यांच्या मुलींचे विवाह सोहळे एक हजार वऱ्हाडींच्या उपस्थितीत धडाक्यात साजरे करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:02 am

Web Title: avoid the two marriage office in kalyan akp 94
Next Stories
1 करोना खाटांचा तुटवडा
2  करोनाबाधिताऐवजी दुसऱ्याच रुग्णाला रक्तद्रव
3 दरवाढीमुळे खवय्यांची कोंबडीकडे पाठ
Just Now!
X