नेहमी ठाण्यात भरणारी खरेदी-विक्रीची प्रदर्शने, बाजारपेठा आणि परिषदांपेक्षा एक वेगळी परिषद ठाण्यात ‘समर्थ भारत व्यासपीठ ’या संस्थेतर्फे भरविण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध विषयांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना एकत्र आणून विविध विषयांवर चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण करणारी ही परिषद म्हणजे समाजातील विविध प्रकाश बेटांना एकत्र करून विकासाच्या प्रकाश वाटा शोधण्याचा प्रयत्न होता.
‘नाही रे’चा सूर लावणारे खूप जण आहेत. पण ‘आहे रे’ म्हणत समाजातील विविध वर्गासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तीही खूप आहेत. अशा व्यक्ती, संस्था ही एकप्रकारे प्रकाशबेटेच आहेत. त्यांना एकत्र केले तर प्रकाशाची वाट तयार होते. या परिषदेचे उद्घाटन डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांनी केले.
मेळघाटात आदिवासीसांठी काम करणारे हे दाम्पत्य समाजाचे खरेखुरे नायक आहेत. त्यांचा साधेपणा, कामाशी असलेली निष्ठा आणि आदिवासी जीवनशैलीशी एकरूप होऊन ते करीत असलेले काम जगविख्यात आहे. अशा या आदर्शवत सेवाव्रतींना ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांसमोर मांडून जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासाची वाट शोधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला. त्यासोबतच शिक्षक परिषद आणि पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेली सरपंच परिषद या मेळाव्यांतून समाजाभिमुख विचारांची देवाणघेवाण झाली. तर ठाणे जिल्ह्यातील विविध मनुष्यबळ विकास कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ‘एचआर’ची परिषदही या निमित्ताने घेण्यात आली. सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेला जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख होती. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. उत्पादक कंपन्या जाऊन सेवा उद्योग विस्तारत चालला आहे. अशा कंपन्यांमध्ये ‘कॉपरेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ अर्थात सीएसआर फंड मोठय़ा प्रमाणात आहे. यापैकी प्रत्येक कंपनीचा एक रुपया जरी जिल्ह्याच्या विकासासाठी खर्च करायचा झाला तर, विकासाची अनेक दालने खुली होती. केवळ शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता अशा कंपन्यांच्या फंडातून अनेक रचनात्मक कामे करता येतील, याची जाणीव या परिषदेच्या माध्यमातून संबंधित कंपन्या आणि तेथे काम करणाऱ्या अधिकारीवर्गाला झाली तरी अशा परिषदांचे ईप्सित साध्य होईल. या परिषदेमध्ये विविध संस्थांचे माहिती देणारे स्टॉल्स होते आणि त्यासोबत जिज्ञासा या संस्थेच्या विविध वैज्ञानिक खेळणी आणि प्रयोगांचे दालनही उभे करण्यात आले होते.
ठाणे जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. आता या जिल्ह्याचे विभाजन झाल्याने बराचसा आदिवासी भाग पालघर जिल्ह्यात गेला आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुपोषणामुळे दगावणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे.
एकीकडे, वाढत्या शहरीकरणामुळे जागोजागी उभ्या राहणाऱ्या त्रितारांकित, पंचतारांकित हॉटेलांतून दररोज शेकडो टन अन्न वाया जाते. तर दुसरीकडे खायला अन्न नाही म्हणून कुपोषणामुळे मुले आणि गर्भवती मातांचा मृत्यू होतो. एकीकडे मोठमोठे मॉल्स उभे राहात आहेत तर, दुसरीकडे आदिवासींच्या वस्त्या आजही उजाड अवस्थेत असल्याचे दिसून येते. ‘आर्ट फेस्टिव्हल’ अशा गोंडस नावांनी महोत्सव भरवून उच्च मध्यमवर्गीयांची कलासक्ती भागवण्याचे काम एकीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा शहरांत वेळोवेळी होत असते. मात्र, या जिल्ह्यात जगप्रसिद्ध वारली कलावंत जिव्या सोम्या म्हसे हे राहतात, हे अनेकांना माहीत नसते. त्यांच्या कलेवर परदेशातून येऊन अनेक लोक पीएच. डी. करतात. पण डहाणू नाक्यावरील माणसालाही म्हसे यांच्या घराचा पत्ता सांगता येणार नाही, अशी परिस्थिती आहे.  
समाजात दिसणारी ही कमालीची तफावत दूर करण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करण्याची गरज असते. डॉ. कोल्हे दाम्पत्य, आमटे परिवारातील सदस्य, डॉ. अभय बंग असे समाजसेवी ठाणे जिल्ह्यात येऊन जातात, तेव्हा ठाणेकरांना आदिवासींची आठवण करून देतात. ठाणेकरांना याची जाणीव झाली तरी, ते
कमी नाही.
प्राची