‘मी कोव्हिड-१९ योद्धा’द्वारे ठाणे शहरात जागृती

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : शहरात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असून अनेक ठिकाणी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे करोना विषाणू पसरण्याचा धोका निर्माण झाला असून ही गर्दी टाळण्यासाठी लोकमान्यनगर आणि सावरकरनगर प्रभाग समितीतील काही तरुणांनी पुढाकार घेतला

आहे. तरुणांनी ‘मी कोव्हिड-१९ योद्धा’ ही मोहीम हाती घेतली असून ही तरुण मंडळी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ‘समाज रक्षक पोलीस मित्र’ म्हणून काम करीत आहेत. त्याचबरोबर हे तरुण परिसरात करोनाविषयी जनजागृती करत आहेत.

शहरातील दाटीवाटीचा समजला जाणाऱ्या लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीच्या परिसरात करोनाबाधितांच्या संख्येने शंभरी पार केल्याने या प्रभागात सर्वत्र ठिकाणी भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. प्रभागातील औषधालय आणि दूध वगळता किराणा मालाची दुकाने आणि भाजी बाजार पूर्णवेळ बंद राहण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. असे असले तरी या भागातील नागरिक प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता सर्रास घराबाहेर पडत आहेत. तर परिसरातील काही भाजीपाला विक्रेते छुप्या पद्धतीने भाजीची विक्री करत आहे. त्यामुळे या भाजीपाल्यांकडे भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

शासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेकडून कठोर कारवाई होत असूनसुद्धा नागरिक या टाळेबंदीच्या नियंमाचे सर्रासपणे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे करोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक वाढला आहे. नागरिकांची विनाकारण होणारी ही गर्दी टाळण्यासाठी परिसरातील काही समजूतदार तरुणांनी ‘मी कोव्हिड – १९’ योद्धा ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची संकल्पना तरुणांनी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. बी. गायकवाड यांना सांगितली. लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभागातील २०-३५ वयोगटातील १०० हून अधिक तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेतला असून प्रभागातील १७ चौकांवर ही तरुण मंडळी पहारा देत आहेत.

मोहीम अशी..

एका चौकात एका वेळी सहा ते सात समाज रक्षक पोलीस मित्र पहारा देतात. यापैकी प्रत्येक पोलीस मित्र ठरवून दिलेल्या चौकातील परिसरात वेळेप्रमाणे फेरफटका मारत असून तेथील नागरिकांमध्ये करोना विषाणूसंबंधित जनजागृती करतो. परिसरात नागरिकांची गर्दी दिसल्यास समाज रक्षक पोलीस मित्र नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करतात. मात्र, नागरिकांनी ऐकण्यास टाळाटाळ केल्यास हे पोलीस मित्र याबाबत पोलिसांना कळवतात. तर परिसरात छुप्या पद्धतीने विक्री करण्यात येणाऱ्या विक्रेत्यांची माहितीही हे तरुण पोलिसांना देत असल्याचे सुभाष एरंडे यांनी सांगितले.