News Flash

लसीकरण वाढीसाठी बोलीभाषांतून जनजागृती

ग्रामीण भागांत जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

ग्रामीण भागांत जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

पूर्वा साडविलकर, लोकसत्ता 

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण पट्टय़ात आगरी, कोळी, कातकरी, ठाकरी, कुणबी अशा वेगवेगळ्या समाजाचा मोठा भरणा आहे. यातील काही समाज पाडे, वाडय़ांमधून गटागटाने वास्तव्य करणारे. या समाजातील बहुतांश नागरिक करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घेत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आता या समाजाशी त्यांच्याच बोलीभाषेत जनजागृतीचा प्रयत्न सुरू केला आहे.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, कलाविश्वात रमणारे प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मदतीला घेऊन कातकरी, आगरी, कोळी, ठाकरी अशा विविध बोलीभाषेतून गाणी, चित्रफिती, लघुपट तयार करण्याचा सपाटा सध्या प्रशासनाने लावला आहे. विशेष म्हणजे, नृत्य, संगीताच्या माध्यमातून होणाऱ्या या प्रचाराला प्रतिसादही चांगला मिळत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.

करोना प्रतिबंधक लस घेतल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तसेच लस घेण्यासाठी केंद्रांवर होत असलेल्या गर्दीत कोणी करोनाबाधित असल्यास आपल्यालाही करोनाची लागण होईल या भीतीने जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यासाठी केंद्रांवर येत नसल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने ‘मिशन मोड’ ही लसीकरण मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत शिक्षक, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेचा पुढील टप्प्यात जिल्हा परिषदेने समाजमाध्यमांद्वारे प्रचार सुरू केला आहे. वाडय़ा, वस्त्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेतून गाणी, चित्रफिती तयार केल्या जात आहेत. शहरी भागातून ज्या पद्धतीने प्रचारासाठी संवादफिती तयार केल्या जातात, त्याचा फारसा परिणाम ग्रामीण भागातील या वस्त्यांमध्ये होताना दिसत नाही. मात्र, त्यांच्याच बोलीभाषेत तयार केली जाणारी गाणी, चित्रफिती, संवादफितीचा अधिक परिणाम जाणवतो अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी दिली. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना, कर्मचाऱ्यांची मदत यासाठी घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळेच्या ८ ते १५ शिक्षकांची समिती तयार करण्यात आली असून हे शिक्षक लसीकरण या विषयावर गाणी, लघुपट, चित्रफीत तयार करत आहेत. या जनजागृती मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातही आता लसीकरणाचा वेग वाढला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणात लसीकरण व्हावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही शिक्षकांची समिती तयार करण्यात आली असून यांच्या संकल्पनेने चित्रफीत, लघुपट तयार करण्यात येत आहेत. या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती होत असून लसीकरणाचा वेगही वाढला आहे.

डॉ. रुपाली सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात असलेला गैरसमज दूर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण तसेच जनजागृती करण्यात येते. मात्र, चित्रफीत, लघुपट या माध्यमांतून मोठय़ा प्रमाणात नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. 

अजय पाटील, शिक्षक, राहनाळ, जिल्हा परिषद शाळा

माझी जबाबदारीलघुपट

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाविषयीचा गैरसमज दूर व्हावा यासाठी राहनाळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अजय पाटील यांनी ‘माझी जबाबदारी’ हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. यामध्ये आई आणि मुलाचा संवाद दाखवण्यात आला आहे. करोना प्रतिबंधक लस आरोग्यासाठी कशी आवश्यक आहे, लशीमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत हे मुलगा आपल्या आईला समजावत असताना दाखविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 12:40 am

Web Title: awareness through regional language for covid 19 vaccination zws 70
Next Stories
1 करोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात जिल्ह्य़ात  वाढ
2 लसीकरणासाठी गावांकडे ओघ सुरूच
3 रक्तद्रव संकलनात वाढ
Just Now!
X