22 February 2020

News Flash

जन्मापासून शाळेपर्यंत!

आपल्या घरात नवा पाहुणा येणार याची चाहूल लागल्यावर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते.

आपल्या घरात नवा पाहुणा येणार याची चाहूल लागल्यावर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते. दिवसभराची चर्चा नव्या पाहुण्याभोवती फिरू लागते. पण याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तसेच विशेषत: पालकांना अनेक प्रश्न पडू लागतात. कोणत्या डॉक्टरकडे जायचे इथपासून ते होणाऱ्या बाळाला कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा अशा एक ना अनेक प्रश्नांभोवती चर्चा रंगू लागते. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अ‍ॅपच्या बाजारात ‘बेबीचक्र’ नावाचे अ‍ॅप उपलब्ध झाले आहे.

समाज माध्यमांवर आपल्या मित्र किंवा मैत्रिणींनी मांडलेली मते, त्यांच्या भावना आदी गोष्टी आपण वाचत असतो, लाइक करत असतो. हे वाचन करत असताना एखाद्या प्रश्नावर आपल्याला असे वाटते की यावर काही तरी झाले पाहिजे. पण करणार कोण, हा प्रश्न असतोच. अशीच एक समान समस्या विधि क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर हारवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केलेल्या नैय्या सागी यांना जाणवली आणि त्यावर त्यांनी उत्तर शोधण्याचे ठरविले. ही समस्या होती ती पालकत्वाबाबत पडणाऱ्या प्रश्नांची. नैय्या यांच्या अनेक मैत्रिणी व मित्र पालक होत असताना त्यांना अनेक प्रश्न पडत होते. त्यांचे प्रश्न ते फेसबुकच्या माध्यमातून इतर मित्रांना विचारत होते. पण त्यावर समाधानकारक आणि अधिकृत उत्तरे देणारी कोणतीच व्यक्ती उपलब्ध नव्हती. त्याच वेळेस नैय्या यांना एक कल्पना सुचली की, महिला गर्भवती राहिल्यापासून पाल्याच्या शाळेची निवड करण्यापर्यंत लोकांना अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांना उत्तर देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. यासाठी त्यांनी त्यावर अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून त्यांना अनेक विभक्त कुटुंबात राहणाऱ्या पालकांना चांगले डॉक्टर कोण, लहान मुलांचे डॉक्टर कोण, आपण राहतो त्या परिसरात चांगले पाळणाघर कोणते आहे, चांगली शाळा कोणती आहे, आपल्या पाल्याला एखादा पदार्थ खायला द्यायचा की नाही, असे एक ना अनेक प्रश्न पडत असल्याचे समोर आले. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी ‘बेबीचक्र’ नावाच्या संकेतस्थळाची सुरुवात केली. त्याचे आता अ‍ॅपमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर गर्भवती महिलेला कितवा महिना सुरू आहे. जर पालक असतील तर बाळाची जन्मतारीख आणि आपले ठिकाण हा तपशील देऊन लॉगइन करता येते. या संकेतस्थळावर लॉगइन केल्यावर आपण ज्या कालावधीत आहोत त्या कालावधीत बाळाची काय काळजी घ्यावी याबाबतचा तपशील आपल्याला दिला जातो. आपण निवडलेल्या परिसरात कोणते चांगले डॉक्टर आहेत किंवा कोणते चांगले पाळणाघर आहे याचा तपशील मिळतो. याचबरोबर आपण तेथे विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरेही मिळतात. ग्राहकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा एक चमू आमच्याकडे कार्यरत असल्याचे नैय्या यांनी सांगितले. त्यांच्यामार्फत या संकेतस्थळावर विचारल्या जाणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली जातात. यात निरोगी आरोग्य कसे ठेवावे, बाळाला कसा आहार द्यावा याबाबत सल्ला दिला जातो. याचबरोबर आपल्या परिसरातील आपल्या पाल्याच्या वयाशी संबंधित पालकांसोबत जोडण्याचा पर्यायही या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. जेणेकरून त्यांच्या अनुभवातून शिकून आपण काही चांगल्या गोष्टी करू शकतो तसेच आपल्या अनुभवातून इतर पालकांना चांगला सल्ला देऊ शकतो. अशा विविध प्रकारे हे संकेतस्थळ काम करत असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच या संकेतस्थळावर आपल्या परिसरातील छायाचित्रकारापासून, एखादा कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या व्यवस्थापक उपलब्ध करून देण्याची सुविधाही पुरविली जाते. यामुळे आपल्या पाल्याचा वाढदिवस किंवा अन्य कोणताही कार्यक्रम करावयाचा झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या सेवांची पूर्तताही या संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

हे संकेतस्थळ सुरू करण्यासाठी सुरुवातीला स्वत:ची गुंतवणूक केली असली तरी अल्पावधीतच त्यांना मुंबई एंजल्सकडून काही निधी उपलब्ध झाला. यानंतरही आणखी एका एंजलकडून निधी मिळाला असून आता पुरेसा निधी असल्याचे नैय्या यांनी नमूद केले. संकेतस्थळाचे मुख्य उत्पन्नस्रोत जाहिरातींचे आहे. विविध लहान मुलांच्या ब्रॅण्ड्सच्या जाहिराती या संकेतस्थळावर असतात. त्यांच्याकडून थेट उत्पन्न घेतले जाते. याचबरोबर जर आपण संकेतस्थळावर पुरविल्या जाणाऱ्या छायाचित्रकार, कार्यक्रम व्यवस्थापक अशा सेवा घेतल्या तर त्यासाठी आपल्याला संकेतस्थळाला काही रक्कम द्यावी लागते. त्यातून संकेतस्थळाचे उत्पन्न होत असल्याचे नैय्या यांनी नमूद केले.

नवउद्यमींना सल्ला

‘चला आपण नवउद्योग सुरू करूयात’ हे म्हणण्यास जितके सोपे आहे तितकेच अवघड प्रत्यक्षात नवउद्योग सुरू करणे आहे. यामुळे नवउद्योग सुरू करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचा सल्ला नैय्या यांनी दिला. याचबरोबर आपण ज्या क्षेत्रात व्यवसाय करत आहोत त्यातील संधी व नफा कसा कमाविता येईल याबाबतही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आपले उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी ते पूर्णपणे तपासून बघा आणि मगच बाजारात आणा असेही त्यांनी सांगितले.

भविष्याची वाटचाल

सध्या ही सेवा मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू या शहरांमध्ये सुरू आहे. असे असले तरी कोलकाता, गुजरात तसेच अनेक निमशहरांमधून लोक या संकेतस्थळावर लॉगइन करत आहेत. पण पुढील एक वर्षांत त्या शहरांपर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचे नैय्या यांनी नमूद केले. तर त्यानंतरच्या तीन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर पोहोचण्याचा मानसही नैय्या यांनी व्यक्त केला. सध्या हे संकेतस्थळ व अ‍ॅप इंग्रजी भाषेत उपलब्ध असून ते भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करण्याचा विचार असल्याचेही त्या म्हणाल्या.

नीरज पंडित

niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit

First Published on December 14, 2016 12:53 am

Web Title: babychakra app
Next Stories
1 वाचनामुळेच खेळाडू म्हणून टिकलो
2 संग्रहालयांना स्वायत्तता हवी!
3 पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ