महापालिका परिवहन उपक्रमाचे चाक खोलात

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नव्या बस धूळ खात

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या स्थापनेला १५ वर्षांचा काळ लोटला असला तरीही हा उपक्रम शहरातील नागरिकांना पुरेशी आणि प्रभावी सेवा देण्यास अद्याप यशस्वी ठरलेला नाही. सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी)च्या निकषानुसार शहरांच्या लोकसंख्येचा विचार करता कल्याण-डोंबिवलीत ५०० हून अधिक बसची आवश्यकता आहे. आर्थिक तिजोरीत खडखडाट असणाऱ्या परिवहन उपक्रमात जेमतेम दोनशेच्या आसपास बस आहेत. मुद्दा केवळ आकडय़ाचा नाही, तर आहेत त्या बस कशा सेवा देतात हा आहे. अनियमित सेवा आणि भोंगळ कारभारामुळे येथील प्रवाशांना रिक्षा प्रवासावर अवलंबून राहावे लागत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात जुन्या ११० तर नव्या ७० बसेस आहेत. त्यातील १३९ बसेस वेगवेगळ्या मार्गावरून धावत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाचा फटका परिवहन सेवेला अनेक वेळा सहन करावा लागतो. त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ लागला आहे.  शहरातील रिक्षाचालकांकडूनही परिवहन सेवेच्या मार्गावरील वाहतूक सेवेला अडथळे निर्माण केले जात आहेत. वाढती लोकसंख्या आणि विस्तारणारे शहर या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने तसेच फेऱ्या कमी होऊ लागल्याने खासगी वाहतूक आणि इतर महापालिकांच्या परिवहन उपक्रमांनी महापालिका क्षेत्रातील उत्पन्न खेचून नेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे घटत्या उत्पन्नामुळे या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी उपक्रमाला कर्ज घेण्याची नामुष्कीही अनेक वेळा आल्याचे स्पष्ट झाले आहे.

’केडीएमटीच्या १३९ बसेस शहरातील आणि अन्य शहरातील २९ मार्गावर फेऱ्या मारतात.

’प्रत्येक बस सरासरी १८० किमीचा प्रवास पूर्ण करत असून कधी कधी हे प्रमाण कमी असते.

’परिवहनचे दिवसभराचे उत्पन्न पाच ते आठ लाखांच्या दरम्यान आहे.

’या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ७० ते ८० हजार प्रवासी दैनंदिन प्रवास करतात.

’दिवसभर चालणाऱ्या बसचा एकूण खर्च आणि प्रवाशांकडून मिळणारे उत्पन्न यामध्ये सुमारे ३ ते ४ लाखांची तूट आहे.

एकमेव आगार

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमासाठी गणेश घाट इथे आगार बनवण्यात आले. या आगारात देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येत असून तेथे बस उभ्या केल्या जातात. या उपक्रमासाठी शहरात सहा भूखंड आरक्षित आहेत. मात्र त्यातील खंबालपाडा आणि वसंत व्हॅली या दोन भागांतील आगाराच्या जागांवर सध्या परिवहन उपक्रमाचा ताबा आहे, तर अन्य भूखंड महापालिकेच्या ताब्यात असून त्यांच्यावर अतिक्रमणे वाढू लागली आहेत.

भर रस्त्यात बस नादुरुस्त

अनेक वेळा कल्याण-डोंबिवली शहरातील प्रवासी परिवहन उपक्रमाच्या बसमधून प्रवास करण्याची टाळाटाळ करतात याचे मुख्य कारण म्हणून या बस रस्त्यात कधीही आणि कुठेही बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना उतरून या बसला धक्का मारण्याची वेळ येऊन ठेपते. नव्याने दाखल झालेल्या बसच्या बाबतीतही अशा घटना घडल्या असून बसमधून धूर येणे, बसला आग लागण्याचे प्रकारही कल्याण-डोंबिवली शहरात दिसून येतात.

घोटाळे फार

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाची गेल्या वर्षांमध्ये सगळ्यात जास्त घोटाळ्यांची चर्चा झाली. उपक्रमाच्या नादुरुस्त बसच्या इंजिनची चोरी, डिझेलमधील घोटाळा अशा विषयांवर गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. या बरोबर कर्मचाऱ्यांच्या दांडय़ा, तिकिटातील आफरातफर आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा हे या पाच वर्षांत शहरवासीयांनी सतत अनुभवले.