घोडबंदरमध्ये महावितरणकडून दुर्लक्ष

पावसामुळे दैना उडालेल्या घोडबंदर भागात अनेक ठिकाणी रहदारीच्या भागात विद्युतवाहिन्या धोकादायक पातळीवर लोंबकळू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाळकुम, वडवली गाव, कावेसर तसेच घोडबंदर सेवारस्त्यांवर लोंबकळणाऱ्या या वाहिन्यांमुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. यासंबंधी वारंवार तक्रारी करूनही वीज कंपनीकडून तातडीने उपाय आखले जात नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. वादळी वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे घोडबंदर येथील बाळकुम भागात विद्युत खांबांवरील वाहिन्या या मूळ उंचीपेक्षा खालच्या दिशेने सरकल्याचे चित्र आहे. विद्युतप्रवाह वाहून नेणाऱ्या वाहिन्या ठरावीक उंचीवर असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या वाहिन्या अधिक खाली आल्याचे दिसत आहे. बाळकुम भागात अनेक शाळा आहेत. शाळेच्या बस या मार्गावरून सकाळ-संध्याकाळ प्रवास करीत असतात. शाळेच्या बसची उंची ही अधिक असल्याने या मार्गावरून जाताना बसचालकांना सावधगिरी बाळगून प्रवास करावा लागत आहे. या भागातून काही मालवाहू वाहने जात असतात. वाहनांची उंची अधिक असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची चिन्हे दिसून येत असल्याचे स्थानिक दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. याच भागात काही ठिकाणी इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या वाहिन्या या तुटल्या आहेत. तुटलेल्या वाहिन्या या रस्त्यावर लोंबकळत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेल्या इंटरनेटच्या वाहिन्या चुकवण्याच्या नादात या भागात अपघात होण्याची दाट शक्यता वाहनचालकांकडून वर्तवण्यात येत आहे. घोडबंदर येथील कावेसर भागातदेखील अशाच प्रकाराची परिस्थिती पाहायला मिळत आहे. घोडबंदर सेवारस्त्यावरदेखील विविध सुविधा पुरवणाऱ्या वाहिन्या जोरदार पावसामुळे तुटून खाली पडल्या आहेत. घोडबंदर सेवारस्त्यावर अनेक खड्डे तयार झालेले आहेत. या खड्डय़ांत पावसाचे पाणी साचते. त्यामुळे लोंबकळणाऱ्या  वाहिन्या पाण्यात पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घोडबंदर भागात ज्या ज्या ठिकाणी विद्युतवाहिन्या या मूळ उंचीपेक्षा खाली आलेल्या आहेत त्या भागात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. पावसाळ्याच्या दरम्यान विद्युतवाहिन्यांमुळे कोणताही अपघात घडू नये याकरिता महावितरणातर्फे खबरदारी घेण्यात आलेली आहे.   – विश्वजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी महावितरण