अधिकाराचा गैरवापर होण्याची भीती

पोलिसांनी विविध उपक्रमांसाठी वसईत एक महिन्यात दहा हजार पोलीस मित्र बनविण्याचा संकल्प केलेला आहे. त्या निर्णयाला हरित वसई संरक्षक समितीने विरोध केला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पोलीस मित्र बनवल्यास त्याचा गैरवापर होण्याची भीती समितीने व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या विविध कामात नागरिकांचा सहभाग असावा या हेतूने पोलीस मित्र ही संकल्पना राबवली जाते. वसईत सध्या अडीच हजार पोलीस मित्र आहेत. वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी एका महिन्यात दहा हजार पोलीस मित्र बनविण्याचा संकल्प सोडला असून वसईतील सातही पोलीस ठाण्यांना महिन्याला दीड ते दोन हजार पोलीस मित्र बनविण्याचे आदेश दिले आहे. तरुणांसोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही पोलीस मित्र म्हणून सहभागी केले जाणार आहे.

हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करून विरोध दर्शविला आहे. नागरिकांचा चांगल्या कामात सहभाग असावा ही भावना स्तुत्य आहे. परंतु पोलिसांचे काम आणि अधिकार सर्वसामान्य व्यक्तींना दिले तर त्याचा गैरवापर होईल आणि तसे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.

‘पोलीस बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करा’

कायदा सुव्यवस्था राखणे हे अत्यंत जबाबदारीचे आणि जोखमीचे काम असते. पोलीस बळ कमी आहे. ते अधिक कसे वाढविता येईल, पोलीस बल साधनसामुग्रीने कसा परिपूर्ण करता येईल त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. पोलीस बळ वाढविण्यासाठी पोलीस प्रमुखांनी शासनाकडे काय पाठपुरावा केला आहे, असा सवाल  हरित वसई संरक्षण समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी  केला.