News Flash

विकासकाच्या खोदकामाने रस्ता खचला

दलदलीच्या ठिकाणी मातीभराव करून बांधकामे

दलदलीच्या ठिकाणी मातीभराव करून बांधकामे

मीरा रोड येथील रामदेव पार्क भागात विकासकाने सुरू केलेल्या खोदकामामुळे महापालिकेने बांधलेला नाला तसेच रस्ता खचला आहे. शनिवारी झालेल्या पावसाने रात्री उशिरा ही घटना घडली आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही.

रामदेव पार्क भागातील मीरा सागर सोसायटीजवळ विकासकाच्या इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या तळमजल्याच्या कामासाठी सुमारे तीस फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. महापालिकेने बांधलेल्या नाल्याजवळ हे खोदकाम सुरू आहे. नाल्याची बाजूची माती खोदकामात काढली गेल्याने तसेच शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे नाल्याच्या खालच्या बाजूला असलेली माती वाहून गेली. परिणामी नाल्याचा मोठा हिस्सा कोसळला तसेच बाजूचा रस्तादेखील खचला. पावसामुळे रस्त्यावर रहदारी नसल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

हा संपूर्ण परिसर पूर्वी दलदलीचा होता. त्यात मातीभराव करून या ठिकाणी रस्ते आणि इमारती बांधल्या गेल्या आहेत. जमिनीखालची माती आजही चिखलाचीच आहे. त्यामुळे एवढय़ा खोलवर खोदकाम केल्यानंतर माती ढासळण्याचा प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

विकासक खर्च करणार

या घटनेनंतर हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. नाला नेमका कशामुळे कोसळला याची पाहणी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. दरम्यान कोसळलेला नाला आणि खचलेला रस्ता बांधून देण्याचे विकासकाने कबूल केले आहे. विकासकाने बांधून न दिल्यास महापालिका हे काम करेल आणि त्याचा खर्च विकासकाकडून वसूल करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:14 am

Web Title: bad road condition in bhayandar
Next Stories
1 तब्बल ४० दिवस महिलेच्या पोटात कापसाचा गोळा
2 आरोपी दुसऱ्याच्याच हत्येसाठी नालासोपाऱ्यात?
3 गावे वगळणे शक्य?
Just Now!
X