कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील खड्डय़ांचा प्रश्न चिघळला आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आयुक्त गोविंद बोडके यांनी पालिका अभियंते, प्रभाग अधिकाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टय़ा रद्द केल्या आहेत. येत्या दोन दिवसात शहर परिसरातील खड्डय़ांचे सव्‍‌र्हेक्षण पूर्ण करून तातडीने ते खड्डे बुजविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

दरम्यान, पालिका हद्दीतील बहुतांशी रस्ते राज्य रस्ते विकास महामंडळ, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत. या प्रशासन यंत्रणांनी आपल्या रस्त्यांची वेळीच देखभाल केली नाही. त्यामुळे मुसळधार पावसात हे रस्ते उखडून गेले आहेत. पालिका हद्दीत हे रस्ते असल्यामुळे या व्यवस्थांच्या निष्काळजीपणाचा रोष पालिकेवर निघत आहे, अशी माहिती एका पालिका अधिकाऱ्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर दिली.

मानपाडा रस्त्यावरील पूल, शिळफाटा सुयोग हॉटेल समोरील पूल रूंदीकरण, विस्तारीकरणाचा घोळ मागील सहा ते सात महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून ठेवला आहे. ही कामे रहदारीला अडथळा ठरत आहेत, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

अधिकाऱ्यांची खरडपट्टी

खड्डय़ांमुळे दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना सेवेतून निलंबित करा, अशा सूचना  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना केल्या आहेत. पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. खड्डय़ांमुळे विरोधकांकडून सेनेला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे शिंदे संतप्त झाले आहेत. शनिवारी त्यांनी कल्याणचा दौरा केला. शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची खरडपट्टी काढली. जे अधिकारी या सगळ्या दुरवस्थेला जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करा. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकू नका, अशा कानपिचक्या शिंदे यांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना दिल्या.

पाच बळी गेल्यानंतर खड्डय़ांवर १३ कोटींची मलमपट्टी

गेल्या आठवडाभरात शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये आपटून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जागे झालेल्या कल्याण डोंबिवली पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी तातडीने १३ कोटी रूपयांचे खड्डे बुजविण्यासाठीचे प्रस्ताव तयार केले आहेत. सोमवारी(ता.१६) होणाऱ्या स्थायी समिती सभेत १२ ठेकेदारांना खड्डे बुजविण्याची कामे देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे.

पालिका हद्दीतील टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, २७ गाव अशा १० प्रभागांच्या हद्दीतील खड्डे बुजविण्याची कामे प्रशासनाने युध्दपातळीवर हाती घेतली आहेत. मागील २० ते २५ वर्षांपासून रस्ते, खड्डय़ांची कामे घेणारे ‘विशिष्ट’ साखळी कंपूतील ठेकेदारांची या कामांसाठी वर्णी लागली आहे. बहुतांशी ठेकेदार उल्हासनगर मधील आहेत. या ठेकेदारांचे पालिका अधिकाऱ्यांशी वर्षांनुवर्ष लागेबांधे आहेत. त्यामुळे मलमपट्टी लावून रस्त्यांची कामे करायची आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून देयक काढायची, अशी पध्दत आहे. हे ठेकेदार काही लोकप्रतिनिधींच्या दावणीला असल्याने त्यांच्या निकृष्ट कामाविषयी कधी कोणी चौकशीची मागणी करीत नाही. या ठेकेदारांच्या कामांविषयी महासभेत काही नगरसेवक आवाज उठवितात, पण त्यांचा आवाज ठेकेदारांच्या वजनापुढे कमी पडतो. गेल्या वीस वर्षांत रस्ते, खड्डय़ांवर हजारो कोटीचा खर्च प्रशासनाने केला आहे. तरीही रस्त्यांचा दर्जा निकृष्ट राहिला आहे.

महादेव कंपनीला एक कोटी ५२ लाख, मे. झा. पी. ठेकेदार एक कोटी ५२ लाख, एम. सी. चंदनानी एक कोटी ३६ लाख, जयहिंद बिल्डर्स एक कोटी ४६ लाख, जेआरबी इन्फ्रास्ट्रक्चर एक कोटी ४६ लाख, प्रगती कन्सट्रक्शन एक कोटी ३६ लाख, व्हीके कन्सट्रक्शन एक कोटी ८५ लाख, जेआरबी इन्फ्रा. एक कोटी ८५ लाख, उर्वरित भारत उद्योग, शंकर ट्रेडर्स, यशराज इन्फ्रा., अजवाणी इन्फ्रा. या ठेकेदारांना ५४ लाख ते ८५ लाख रूपयांपर्यंतची खड्डे बुजविण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

पावसाळ्यापूर्वी हा निधी खर्च केला असता तर रस्ते सुस्थितीत राहून सामान्यांचे बळी खड्डय़ांमध्ये गेले नसते. आता खड्डे बुजविण्याची वरवरची मलमपट्टी म्हणजे ठेकेदारांचे खिसे भरण्याची कामे प्रशासन करीत आहे, अशी टीका शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

खड्डे दुरावस्थेला जबाबदार धरून एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती आहे.

पालिका कर्मचारी गंभीर जखमी

कल्याण डोंबिवली पालिकेतील आपत्कालीन विभागातील कर्मचारी विलास दलाल (४३) शुक्रवारी रात्री खड्डे चुकविण्याची कसरत करत असताना दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडला. या अपघातात त्यांना डोक्याला जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नेतिवली येथील खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  त्यांच्या डोके, हाताला दुखापत झाली आहे, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.