कल्याण-डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांची माहिती

पावसाने विश्रांती घेतल्याने कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे अस्फाल्टिंग तंत्रज्ञानाने भरण्यात येतील. गणपतीपूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरून सुस्थितीत करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत सांगितले.

दरम्यान, पालिका हद्दीत खड्डे का पडले याची स्वतंत्र चौकशी करून त्याचा अहवाल महासभेसमोर ठेवण्यात येईल. प्राप्त परिस्थितीत खड्डे का पडले. याचा र्सवकष दोष अधिकारी किंवा ठेकेदारांवर ठेवता येणार नाही, परंतु या सर्व परिस्थितीची चौकशी करण्यात येईल, असे आयुक्त बोडके यांनी सांगितले.

पालिका हद्दीत गेल्या दोन महिन्यांत पडलेले खड्डे त्यामुळे गेलेले जीव या विषयावर पाच नगरसेवकांनी सभा तहकुबी मांडली होती. अडीच तास सर्वपक्षीय नगरसेवकांनी या विषयावर चर्चा केली. उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सांगितले, की दरवर्षी पावसाळा आला की एक ते दोन सभा फक्त सभा तहकुबीवर गाजतात. चर्चा केल्या जातात. नगरसेवक एकमेकांवर आरोप करून गदारोळ करतात. त्याचा फायदा अधिकारी वर्ग उठवितो. खड्डे कोणामुळे पडले, जबाबदाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांनी पार पाडल्या नाहीत याची कधी सभागृहात चर्चा केली आहे का? अशीच चर्चा सध्या सभागृहात सुरू आहे. हे थांबले पाहिजे.

मनसेच्या कस्तुरी देसाई यांनीही उत्सवासाठी रस्त्यावर खड्डे खणले तर प्रशासन दहा हजार रुपये दंड ठोठावणार. मग रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारांमुळे एवढे खड्डे पडतात. त्यांना प्रशासन कधी दंड ठोठावणार. त्यांची देयक मात्र रीतसर अधिकाऱ्यांकडून काढली जातात, असे सांगितले.

‘मार्च-एप्रिलमध्ये खड्डे भरणे, नालेसफाई कामाचे योग्य नियोजन अधिकाऱ्यांनी केले. तर नेहमीप्रमाणे नालेसफाई, खड्डे या विषयांवर कधीच चर्चा करण्याचा प्रश्न येणार नाही, असे सभापती राहुल दामले यांनी सांगितले. एमएसआरडीसीने पालिका हद्दीतील रस्ते सुस्थितीत ठेवावेत. शहरातील अनेक रस्ते समतल स्थितीत नाहीत, असे राजन सामंत म्हणाले. २७ गाव, टिटवाळा परिसरातील खड्डय़ांच्या भीषण परिस्थितीवर यावेळी चर्चा झाली. मागील सहा वर्षांत सिमेंट रस्ते सोडून नवीन रस्ते कामे झाली नाहीत. त्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे आयुक्तांनी कबूल केले.

पालिका हद्दीत ५४० किमीचे रस्ते आहेत. १५० किमी रस्त्यांवरील खड्डय़ांची कामे पूर्ण केली आहेत. सहा हजार खड्डय़ांपैकी साडेचार हजार खड्डे पूर्ण भरले आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले की तातडीने उर्वरित कामे पूर्ण केले जातील.   -गोविंद बोडके, आयुक्त