चार महिन्यांनंतरही दुरुस्ती करण्यात अपयश; अर्धवट डांबरीकरण, रस्त्यावर बांधकाम साहित्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेला मुंब्रा बाह्य़वळण रस्ता गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याच्या सरकारच्या घोषणेनुसार सोमवारपासून वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र दुरुस्ती करण्यासाठी चार महिने आणि तीनवेळा मुदतवाढ घेतल्यानंतरही या रस्त्याची अनेक कामे अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. उड्डाणपुलावरील अर्धवट डांबरीकरण, दुभाजकांची अपूर्ण बांधणी, मुख्य रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य, त्यामुळे उडणारी धूळ यामुळे सोमवारपासून खुल्या झालेल्या या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनांना अडथळे येत आहेत.

या रस्त्यांवर दररोज पडणारा अवजड वाहनांचा भार लक्षात घेता अर्धवट अवस्थेत असलेले हे काम हा भार सहन करू शकेल का, असा प्रश्न या मार्गावरून सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून उपस्थित केला जात होता. तसेच झालेले काम पुरेशा दर्जाचे नाही अशी कुजबुजही या ठिकाणी सुरू होती. याविषयी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठोस  उत्तर देणे मात्र टाळले.

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचे काम दोन महिन्यांत पूर्ण केले जाणार होते. मात्र चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला तरी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नव्हता. याबद्दल नागरिकांतून रोष व्यक्त होऊ लागल्यानंतर राज्य सरकारने गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत खुला करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारपासून हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. नूतनीकरण करण्यात आलेल्या या रस्त्याच्या उद्घाटनाला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार होते, मात्र ऐनवेळेस त्यांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी रात्री तर शिवसेनेने सोमवारी सकाळी या मार्गाचा ‘उद्घाटन सोहळा’ उरकून घेतला. परंतु उद्घाटनासाठी पुढे पुढे करणाऱ्या राजकीय पक्षांनी या रस्त्याच्या पूर्णत्वाची तपासणीही केली नसल्याचे दिसून येत आहे.

उड्डाणपुलावर पूर्णपणे डांबरीकरण करण्यात आले नसून काही भागाचे डांबरीकरण अजूनही शिल्लक आहे. तसेच ज्या भागात डांबरीकरण करण्यात आले आहे त्या ठिकाणच्या डांबराचा थर  पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे उखडेल इतका वरवरचा दिसत आहे. यासंदर्भात मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्ती व्यवस्थापक प्रेम सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, डांबरीकरणाचे काम पूर्ण आणि योग्यप्रकारे झाले असून वाहतुकीनंतर डांबरी रस्ता आणखी मजबूत होईल. त्यामुळे हा रस्ता उखडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कळवा-पारसिक रेतीबंदर येथून मुंब्रा बाह्य़वळण मार्ग सुरू होतो. या मार्गाच्या पायथ्याशी डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले दिसून येत नाही. त्यानंतर पुढे या मार्गावर रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविलेले दिसून येत नाही. काही ठिकाणी दुभाजक म्हणून ड्रम ठेवलेले दिसून येतात, तर काही ठिकाणी दुभाजकाच्या कामासाठी लोखंडी गज उभारून ठेवलेले आहेत. मुंब्य्राहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर बांधकाम साहित्य पडलेले दिसून येते. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी त्याचे काम अजूनही अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसून येते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad road condition in thane
First published on: 11-09-2018 at 00:47 IST