शिवाई बालक मंदिर ट्रस्ट डोंबिवली यांच्या वतीने शिवाई आंतरशालेय वर्षां मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी सकाळी करण्यात आले होते. मात्र चाळण झालेले रस्ते, पाणी आणि चिखलाने भरलेल्या खड्डय़ातून मार्ग काढताना कसरत करावी लागल्याने ही मिनी मॅरेथॉन अडथळ्यांची शर्यत बनली.
या स्पर्धेचे हे १४वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांनी यंदाही मोठी गर्दी केली होती. ८ ते १८ वर्षे वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या ११ गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. १० किमी ते १ किमी अशा अंतरावर ही स्पर्धा भरविण्यात आली. कल्याण तालुक्यातील ८८ शाळांच्या ७ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात ५०८५ विद्यार्थी व २७९२ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यंदाचा स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे गतिमंद विद्यार्थ्यांनी प्रथमच या स्पर्धेत आपली उपस्थिती लावली होती. या गटातून ९० स्पर्धक सहभागी झाले होते.
पावसामुळे कल्याण ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्डय़ांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांचा अडथळा पार करतच मुले आपला मार्ग पुढे काढत होती. शिवाई बालक मंदिर शाळेजवळून या स्पर्धेची सुरुवात झाली. या सुरुवातीच्या ठिकाणीच रस्त्याच्या बाजूला सिमेंट व खडीमिश्रित भराव टाकण्यात आला होता. मात्र पावसाने ती खडी निघून गेली होती. अरुंद रस्त्यांमुळे व पालक, परीक्षकांच्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना त्यांना बाजूला करून आपल्या स्पर्धेची सुरुवात करण्यासच मोठे कष्ट घ्यावे लागत होते. स्पर्धा सुरू होताच येणारा स्पीड ब्रेकर लक्षात न आल्याने व त्या समोरच असलेल्या खड्डय़ातच अनेक मुलांचा तोल जात होता. यामुळे चेंगराचेंगरी व धक्काबुक्कीचे प्रकार घडले. काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली, तर काहींना मुक्का मार या खड्डय़ांमुळे लागला.
शिवाई मिनी मॅरेथॉन स्पर्धा येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आयोजित करण्यात यावी जेणेकरून दरवर्षी विद्यार्थ्यांना या सर्व समस्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी  मागणी पालक वर्गातून होत आहे. स्पर्धेचा निकाल..
दहा किमी मुलांच्या गटात अक्षय टेंबे याने प्रथम क्रमांक तर द्वितीय प्रेम यादव, तृतीय प्रदीप सिंग याने पटकाविला. तर ७ किमी मुलींच्या गटात अपूर्वा सायकर हिने प्रथम, योगिता बडगुजर द्वितीय, गीता शेलवले हिने तृतीय क्रमांक पटकाविला. गतिमंद विद्यार्थ्यांच्या १ किमी धावण्याच्या स्पर्धेत जतिन कदम प्रथम, रतन गुडेकर द्वितीय, रोहित जाधव तृतीय, मुलांच्या लहान गटात राम शिंदे, तर मुलींमध्ये रिद्धी रामनाखवा हिने बाजी मारली. १४ वर्षांखालील गटात मुलांमध्ये अंकुश यादव व मुलींमध्ये तन्वी महांगडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.