गळके छप्पर, धोकादायक खोल्यांमुळे वर्ग रिकामे

‘माझ्या गुरूजींची गाडी’ या लघुपटाच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचलेली ठाणे जिल्हा परिषदेची पिसवली येथील शाळा सध्या उजाड होण्याच्या बेतात आहे. अमेरिकेतील ‘मियामी चित्रपट महोत्सवात’ पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या या लघुपटातील ही शाळा गेल्या पाच वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. गळके छप्पर, वापरण्यायोग्य नसलेल्या खोल्या, स्वच्छतागृहांची दुर्दशा या परिस्थितीमुळे या शाळेत सध्या वर्ग भरवणेही कठीण बनले आहे.

कल्याण तालुक्यातील पिसवली येथील या शाळेतील शिक्षकांनी दिग्दर्शित केलेला आणि शिक्षक-विद्यार्थ्यांच्या अभिनयाने रंगलेला ‘माझ्या गुरूजींची गाडी’ हा लघुपट इंटरनेटच्या माध्यमातून ६८ देशांत पोहोचला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या या लघुपटामुळे पिसवलीची शाळाही चर्चेत आली. मात्र, हे वलयही शाळेला दुरवस्थेपासून रोखू शकलेले नाही. या शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळय़ात येथे वर्ग भरतील का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.

या शाळेत पहिली ते आठवीचे एकूण ३८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण अकरा खोल्यांच्या या शाळेत सहा खोल्यांची अवस्था अत्यंत बिकट असून उर्वरित पाच खोल्या वापरण्यासाठी योग्य आहेत. अकरा खोल्यांपैकी केवळ एकमेव खोली ही जिल्हा परिषदेने उभारली असून उर्वरित खोल्या या येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने उभ्या राहिल्या आहेत. आपल्या गावातील मुलांनीही शहरातील मुलांप्रमाणे उत्तम शिक्षण घ्यावे, या उद्देशाने शाळेच्या विविध अडचणींमध्ये येथील ग्रामस्थ शाळेला आर्थिक सहकार्य करत असतात. या शाळेमध्ये विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक आहे. मात्र त्यांच्यासाठी उभारलेल्या स्वच्छतागृहाची डागडुजी करण्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. मात्र पिसवली शाळेची अवस्था पाहता शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्याने या विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. दरवर्षी शाळेच्या डागडुजीसाठी अवघे दहा हजार रुपये देण्यात येतात, मात्र तेही अपुरे पडत असल्याने ग्रामस्थांकडून मदत मागावी लागत असल्याचे शाळेचे मुख्याध्याक अजय पाटील यांनी सांगितले.

दरवर्षी सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या डागडुजीसाठी अनुदान देण्यात येते. पिसवली शाळेलाही अनुदान देण्यात आले होते. त्यातून त्यांनी पावसाळी पूर्व उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र तरीही वर्ग खोल्यांचे छत गळत असतील तर आम्ही त्याकडे प्राधान्याने लक्ष देऊ आणि दुरुस्तीसाठी प्रयत्न करू.    – संगीता भागवत, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, ठाणे