ठाणे-मुंब्रा ते शिळफाटा, शिळफाटा ते दुर्गाडी उड्डाण पूल, भिवंडी बाह्य़ वळण (बायपास) रस्ता ते ठाणे अशा त्रिकोणी रस्त्यांवर सध्या कधी नव्हे एवढी वाहतूक कोंडी होत आहे. सकाळच्या वेळेत या तिन्ही प्रशस्त रस्त्यांवरून मुंबई, नवी मुंबई, ठाण्याच्या दिशेने कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिवहन विभागाच्या बस, राज्य परिवहन महामंडळाच्या बस, खासगी वाहनांनी जाणे म्हणजे सध्या मोठे दिव्य होऊन बसले आहे. लोकल प्रवासाला कंटाळून लोकांनी रस्त्याचा मार्ग पत्करला असला तरी तिथेही त्यांची त्यामुळे कोंडी होऊ लागली आहे. नियम न पाळता आपापल्या गाडय़ा दामटणारे चालकच या कोंडीला कारणीभूत ठरले आहेत.

लोकलच्या या घुसमटीला कंटाळलेला साधारणपणे २० ते ५० वयोगटातील तरुण, वरिष्ठ गटातील नोकरदार एक तर आपल्या खासगी वाहनाने नोकरीच्या ठिकाणी जाण्याला पसंती देतात किंवा उपलब्ध असेल तर आपल्या कंपनीच्या वाहनातून कार्यालयात पोहोचण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय अलीकडे ओला उबर टॅक्सीची घरपोच आणि कार्यालय सेवा आरामदायी, विनाकटकटीची असल्याने अनेक चाकरमानी गट करून अशा टॅक्सी सेवेला प्राधान्य देत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांच्या वेशीवर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ओला उबर टॅक्सीचालकांची घरघर सुरू असते. अनेक प्रवासी या टॅक्सीच्या माध्यमातून आपला नवी मुंबई, मुंबई, पनवेल, ठाणेपर्यंत प्रवास करतात. या सगळ्या आरामदायी प्रवासात आणखी आरामदायी व स्वतंत्रपणे प्रवास करू म्हणून २० ते ४० वयोगटातील नोकरदारांचा काही वर्ग दुचाकी खरेदी करून आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अलीकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवान दुचाकी बाजारात उपलब्ध आहेत. या दुचाकींची एकूण धाव आणि वेग पाहता या दुचाकींवरून बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडीसारख्या ठिकाणाहून नवी मुंबई औद्योगिक विभाग, ठाणे औद्योगिक विभाग किंवा कोकणभवन आदी सरकारी कार्यालयांच्या ठिकाणी एक तासाच्या आत पोहोचता येते. याशिवाय, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी हब) बहुतेक कंपन्या नवी मुंबई, महापे, ठाणे, बेलापूर पट्टय़ात आहेत. मुंबईतील कॉर्पोरेट कंपन्यांची बहुतांशी कार्यालये नवी मुंबई परिसरात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारा तरुण वर्ग अत्याधुनिक पद्धतीची दुचाकी खरेदी करून राजा स्टाइल आपल्या दुचाकीवर स्वार होऊन प्रवास करतो. दुचाकीवरील प्रवास त्यांच्यासाठी सर्वच दृष्टींनी सोयीचा ठरतो. वाहने खरेदी करण्यासाठी हल्ली एवढेच आणि तेवढेच वेतन हवे असेही काही नसते. बँकेच्यासमोर उभ्या असलेल्या नव्या कोऱ्या दुचाकीजवळील एक सुटाबुटातील टायवाला आपल्याला दोन मिनिटांत मोहित करतो आणि आपण दुचाकी खरेदी करण्यासाठी त्याच्या हातातील विहित नमुन्यातील कोऱ्या अर्जावर स्वाक्षऱ्या करतो. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत दुचाकी घराच्या दारात उभी राहते. असा हा बिनभांडवली कर्जव्यवहार सोपा असल्याने बहुतांशी जण अलीकडे दुचाकी खरेदीला प्राधान्य देत आहे आणि त्यावरून प्रवास करणे म्हणजे राजेशाही प्रवास समजून प्रवास करीत असतो.

दुचाकींना आवरण्याची वेळ

मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तसेच दुचाकींचे झाले आहे. अनेक दुचाकीस्वार आपली दुचाकी म्हणजे जणू ‘जेट’ विमान आहे की काय अशा आविर्भावात रस्त्यावरून चालवितात. अत्याधुनिक पद्धतीच्या या दुचाकीचा आवाज (फायरिंग), तिचा वेग दामदुप्पट असल्याने जणू ती खूप वेगात चालविली पाहिजे, असा अनेक दुचाकीस्वारांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे रस्ता शिळफाटा असो, भिवंडी बाह्य़ वळण रस्ता असो नाही तर शहरातील गल्लीबोळातील असो. हे दुचाकीस्वार सुसाट वेगाने आपल्या दुचाकी तंद्रीत चालवितात. समोर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सायकल जाण्यासाठी पुढे जागा नाही. अशी परिस्थिती असली तरी, हे दुचाकीस्वार आपण दुचाकी थांबवून एका जागी उभे राहू. अन्य वाहने पुढे सरकू लागली की मग पुढे जाऊ, असा विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. वेगवान दुचाकीस्वार वाहतूक कोंडी असताना, रस्त्याच्या कडेकडेने हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. एकापाठोपाठ हे दुचाकीस्वार पुढे जाऊन, अशा विशिष्ट ठिकाणी अडकून पडतात की, वाहतूक कोंडी सुटण्यासाठी जो मार्ग उरलेला असतो, तोही बंद करून टाकतात. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांना आवर घालण्याची वेळ आली आहे.

चालकांची मुजोरी

आणखी एक प्रकार म्हणजे, वेगवान दुचाकीस्वारांनी रस्त्याची एक बाजू बंद करून टाकली की, काही अति विद्वान दुचाकीस्वार मग हळूच डाव्या बाजूने जाणे आवश्यक असताना, आपण या कोंडीतून सुटका करून झटकन पुढे जाऊ म्हणून रस्त्याच्या उजव्या (म्हणजे येणाऱ्या वाहनांच्या दिशेने) बाजूचा उपयोग करून उलटय़ा दिशेने प्रवास सुरू करतात. एक दुचाकीस्वार पुढे सरकला की मग त्याच्या पाठोपाठ सगळे दुचाकीस्वार उलटय़ा बाजूने आपला नियमबाह्य़ प्रवास सुरू करतात. हे सगळं चित्र सकाळ, संध्याकाळ शिळफाटा, भिवंडी बाह्य़ वळण रस्ता, ठाणे ते मुंब्रा या रस्त्यांवर कोंडी झाली की पाहायला मिळते. म्हणजे रस्त्याच्या एका (डावी बाजू) बाजूला कोंडी झाली की आपल्या अति हुशारीने दुचाकीस्वार कोंडीत आणखी भर घालतात. त्यामधून सुटका नाही म्हणून दुसऱ्या बाजूने (उजव्या) उलटा प्रवास सुरू करून वाहतूक कोंडीत आणखी भर घालतात. समोरून वाहने येत असताना (उजव्या बाजुने) दुचाकीस्वार त्यांच्या समोरून पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करतात. हा उलटा प्रवास अनेक दुचाकीस्वारांच्या जिवावर बेतणारा असतो. त्याची ते पर्वा करीत नाहीत. त्यात एखादा अपघात झाला तर दुचाकीस्वार स्वत: अडचणीत येतोच; पण जो वाहनचालक त्याच्या मार्गिकेतून सरळ प्रवास करतोय, त्याला अडथळा आणून ते त्यालाही खड्डय़ात घालतात.

बेकायदा बांधकामांतून मिळालेला पैसा, गुंठेवारीत मारलेला हात, इमारत साहित्य पुरविण्याच्या धंद्यातून मिळालेली बेगमी याचा वापर करीत कामधंदा नसलेल्या अनेक स्थानिक खुशालचेंडूंनी दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. हे उडाणटप्पू खुशालचंद रस्ते आपल्या मालकीचे अशा थाटात बिनधास्तपणे रस्ता दुभाजकामधील बॅरिकेडस्, अडथळे ढकलून देऊन उलटय़ा बाजूने प्रवास करतात. एक गाववाला असा उलटय़ा बाजूने प्रवास करायला लागला की त्याच्या मागे मार्गिकेतील सगळी वाहने उलटय़ा बाजूने धावू लागतात. अशा उलटय़ा बाजूने वाहने चालविणाऱ्या चालकांकडे वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत पाहत बसतात, याचे प्रत्येकाला आश्चर्य वाटते. हा सगळा गोंधळ सुरू असताना वाहनांवर आमदार, नगरसेवक लिहिलेल्या या लोकप्रतिनिधींच्या समर्थकांचा आपणास जणू काही कसेही वागण्याचा परवाना देण्यात आला आहे, असा समज झाला आहे. याचा विचार न करता लोकप्रतिनिधींचे पाठीराखे अन्य वाहनचालकांना आम्हाला किती घाई आहे, असे सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात कोंडीत मोलाची भर घालतात.

कायद्याची कठोर अंमलबजावणी

बरं, हे उलटे दुचाकी, चारचाकी स्वार रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक(वॉर्डन) यांना दिसत नाहीत, असे नाही. वाहतूक पोलिसांच्या समोरून बिनधास्तपणे हे वाहनस्वार निमूटपणे पुढे जातात. वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेण्याशिवाय या दुचाकी स्वारांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत. शिळफाटा, भिवंडी वळण रस्ता, ठाणे मुंब्रा रस्ता या रस्त्यांवर नियमित वाहतूक कोंडीची अन्य काही कारणे असली तरी, त्यामध्ये स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी उलटय़ा बाजूने दुचाकी, चारचाकी स्वारांची घुसखोरी ही मोठी समस्या अलीकडे होऊन बसली आहे. त्यांच्यासाठी वाहतूक विभागाने आतापासून कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. उलटय़ा दिशेने येणारा दुचाकीस्वार असो वा चारचाकी वाहनचालक. त्याच्याकडून वाहतुकीचे नियम तोडले म्हणून जबर दंड वसूल करण्यात यावा. असा प्रकार संबंधित वाहनचालकांनी दुसऱ्यांदा केला तर दंडाबरोबर त्याच्या वाहनाच्या चाकांची आहे त्या ठिकाणी हवा काढून टाकण्यात यावी. तोच वाहनचालक तिसऱ्यांदा उलटय़ा मार्गिकेतून येऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकाचा वाहतूक परवाना रद्द करण्याची शिफारस उपप्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) करण्यात यावी. जोपर्यंत वाहतूक पोलीस अशी आक्रमक भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत उलटय़ा दिशेच्या मार्गिकेतून वाहन चालविण्याची जी शर्यत लागली आहे, ती थांबणार नाही आणि तोपर्यंत वाहतूक कोंडीचे नष्टचर्य संपणार नाही.