बदलापूरच्या ‘होम प्लॅटफॉर्म’साठी २०२१ उजाडणार

सागर नरेकर, बदलापूर

दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढल्याने बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांना रोजच रेटारेटीचा सामना करावा लागत आहे. जिने अपुरे पडत असल्याने ‘होम प्लॅटफॉर्म’ची मागणी आहे. मात्र पहिल्यांदा निविदा रद्द झाली. आता पुन्हा याची निविदा नुकतीच जाहीर झाली असून काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

फलाट क्रमांक एक आणि दोनवर मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल उभ्या असतात. त्यामुळे येथे सर्वाधिक गर्दी होते. त्या तुलनेत या फलाटावरील जिने अरुंद आहेत. गर्दीच्या वेळी स्थानकाबाहेर पडण्यासाठी १५ ते २० मिनिटे थांबावे लागते.

यातून सुटका मिळविण्यासाठी काही वर्षांपासून फलाट क्रमांकएकला लागून होम प्लॅटफॉर्मची मागणी होती. खासदार कपिल पाटील यांनीही २०१६ मध्ये होम प्लॅटफॉर्मची घोषणा केली होती.

होम प्लॅटफॉर्मसाठी आवश्यक जागेसाठी भूमी अधिग्रहण करावे लागणार आहे. तसेच या होम प्लॅटफॉर्मसाठी पहिली निविदा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर सहा महिने याचे काम ठप्प होते.

नुकतीच मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून २५ ऑक्टोबर रोजी याची निविदा जाहीर करण्यात आली आहे. यासाठी १४ कोटींचा खर्च अपेक्षित असून फलाटावरील इतर सुविधांचाही त्यात समावेश आहे. मात्र कामासाठी कंपनी नेमून, कार्यादेश मिळवत भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया आणि काम पूर्ण करण्यात किमान दोन वर्षांचा काळ जाण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मसाठी २०२१ हे वर्ष उजाडणार आहे.