पेट्रोल, डिझेलपेक्षा कमी खर्चीक पर्यायाचा शोध; उत्कृष्ट संशोधकाचा पुरस्कार; पेटंटही मिळविले
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार स्वस्त-महाग होणाऱ्या पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यासाठी जगभरातील देशांत संशोधन सुरू आहेत. असे असतानाच, बदलापुरातील सौरभ पाटणकर या विद्यार्थ्यांने ‘गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन’ नावाच्या इंधनाची निर्मिती केली असून जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करत कमी खर्चात इंधन निर्माण करण्याची किमया त्याने साधली आहे. सौरभने या इंधनाचे बौद्धिक संपदा हक्कदेखील (पेटंट) मिळवले आहेत.
बदलापूर पूर्वेला राहणाऱ्या सौरभ पाटणकरने पीएच.डीमध्ये संशोधन करताना भविष्यातील जैव इंधनाला पर्याय ठरणाऱ्या गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन या इंधनाच्या निर्मितीवर संशोधन करत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत या इंधनाच्या निर्मितीवर सुमारे दीडशे डॉलर प्रतिबॅरल इतका खर्च होत होता. मात्र, मुंबईतील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिस्ट्री या विषयात पीएचडीसाठी संशोधन करताना सौरभने हेच इंधन कमी खर्चात तयार केले. यासाठी त्याने गवत, जंगलातील काटय़ाकुटक्या असे नैसर्गिक घटक तसेच लॅवोनिक आम्ल यांचा वापर केला. या पदार्थावर एकाच रसायन भट्टीमध्ये पाण्यात अभिक्रिया करून त्याने ‘गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन’ या इंधनाची निर्मिती केली. या पद्धतीने हे इंधन ५० डॉलर प्रतिबॅरल इतक्या कमी किमतीत मिळू शकणार आहे. या संशोधनासाठी ग्रीन केमिस्ट्री फाऊंडेशनतर्फे मुंबईतील जे.डब्ल्यू. मेरीयट हॉटेलमध्ये भारतातील उत्कृष्ट संशोधक म्हणून इंडस्ट्रीयल ग्रीन केमिस्ट्री वर्ल्ड २०१५ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, अमेरिकन केमिकल जर्नल या मासिकात त्याचा प्रबंधही प्रकाशित झाला आहे. या कामी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिस्ट्रीमधील त्याचे प्राध्यापक गणपती यादव यांची त्याला मदत झाली आहे. तसेच, त्याला पुढील संशोधनासाठी ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली असून तो सध्या त्यासाठी नुकताच कॅनडाला गेला आहे.