21 February 2019

News Flash

आहे चौथी मुंबई तरीही..

सात बेटांमुळे अगदी सुरुवातीपासूनच मुंबई शहराच्या विस्ताराला मर्यादा होत्या. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात अगदी सुरुवातीपासूनच नियोजनकर्ते मुंबई शहराच्या वाढीसाठी शेजारील प्रदेशात जागा शोधू लागले.

| August 28, 2015 12:53 pm

सात बेटांमुळे अगदी सुरुवातीपासूनच मुंबई शहराच्या विस्ताराला मर्यादा होत्या. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात अगदी सुरुवातीपासूनच नियोजनकर्ते मुंबई शहराच्या वाढीसाठी शेजारील प्रदेशात जागा शोधू लागले. सत्तरच्या दशकात शासनाने सिडको प्राधिकरणाची स्थापना करून खाडी पलीकडे नवी मुंबई हे कृत्रिम शहर वसवून या विस्तारीकरणाला नियोजित वाट करून दिली. मात्र मुंबई काही फक्त नवी मुंबईतच विस्तारली नाही. बेलापूरची वेस ओलांडून तिने थेट रायगड जिल्ह्य़ातील पनवेलपर्यंत हातपाय पसरले. होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे पनवेल परिसरात तिसरी मुंबई आकारास येऊ लागली. मात्र मुंबईच्या या दोन विस्तारीत रूपांबरोबरच गेल्या दहा वर्षांत कल्याण पलीकडच्या उपनगरांमध्ये चौथी मुंबई आकारास येऊ लागली आहे. या चौथ्या मुंबईचे प्रवेशद्वार ऐतिहासिक कल्याण शहर असले तरी त्याचा केंद्रबिंदू मात्र बदलापूर आहे. अवघ्या दहा वर्षांपूर्वी बदलापूरमध्ये घर घेणे हा मुंबई परिसरातील ग्राहकांसाठी अगदी शेवटचा पर्याय होता. नाइलाज म्हणून लोक बदलापूरचा पर्याय निवडत होते. आता मात्र दशकभरात परिस्थिती पूर्णपणे बदलली असून मुंबई-ठाण्याच्या तुलनेत किफायतशीर किमतीत घरे उपलब्ध असल्याने गरज आणि गुंतवणूक या दोन्ही हेतूने येथील गृहनिर्माण व्यवसाय भरभराटीला आला आहे.
१९९०च्या दशकात अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची वाढ होऊ लागली. याच काळात अंबरनाथमध्ये लोकनगरी गृहप्रकल्प आला. त्या काळात शहरातील साई विभाग, कानसई विभाग आदी परिसरांत साधारण साडेतीनशे ते चारशे रुपये प्रतिचौरस फूट दराने सदनिका मिळत होती. बदलापूरमध्ये तर त्याहीपेक्षा कमी दरात घर मिळत होते. त्यामुळे मुंबईतील अनेक मध्यमवर्गीयांनी गुंतवणूक म्हणून या भागात घरे घेतली. साधारण २००५ नंतर मुंबई-ठाण्यातील घरांच्या किमती प्रचंड वाढल्या. सर्वसामान्यांना तिथे घर परवडेनासे झाले. परिणामी आता गेल्या २५ वर्षांत घरांच्या किमती किमान दसपटीने वाढल्या आहेत. गेली दोन वर्षे मात्र गृहनिर्माण क्षेत्रातील मंदीमुळे या परिसरातील घरांच्या किमती स्थिर आहेत.
नव्या शहराची पायाभरणी  
अंबरनाथ पूर्व विभागात रेल्वे स्थानक परिसरात शहर वाढीला मर्यादा आहेत. ठाण्यात घोडबंदर किंवा खडकपाडा परिसरात जसे नवे शहर उदयास येऊ लागले आहे, तसेच अंबरनाथमध्येही प्राचीन शिवमंदिराच्या मागे पालेगाव परिसरात नवे अंबरनाथ वसू लागले आहे. विविध बांधकाम व्यावसायिकांचे किमान शंभर ते पाचशे सदनिकांचे गृहप्रकल्प येथे सध्या निर्मिती अवस्थेत आहेत.
रोजगाराच्या संधी
अंबरनाथ हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. मध्यंतरीच्या काळात विम्को, धरमसी मोरारजी, के. टी. स्टील, स्वस्तिक आदी बडय़ा कंपन्या बंद झाल्याने ही औद्योगिक ओळख भूतकाळात जमा होण्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र पूर्वेकडे विस्तारित अंबरनाथ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक वसाहतीमुळे अंबरनाथचा हा लौकिक कायम राहणार आहे. सध्या राज्यातील या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठय़ा औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे ८५० कारखाने आहेत. .
धरण असलेले शहर
महाराष्ट्रात मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेचा अपवाद वगळता कोणत्याही महापालिकेच्या मालकीचे धरण नाही. अपवाद फक्त अंबरनाथचा. छोटेखानी हा होईना स्थानिक प्रशासनाच्या मालकीचे चिखलोली धरण आहे. या धरणातून पूर्व विभागात प्रतिदिन सहा दक्षलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होतो. या धरणाच्या विस्तारीकरणाचाही प्रस्ताव आहे. तो मार्गी लागल्यावर येथून दुप्पट म्हणजे १२ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होऊ शकेल. पश्चिम विभागातील नालिंबी नदीवरही बंधारा बांधून त्या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची योजना पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
पुढील १५ वर्षांच्या पाण्याचे नियोजन
२०११च्या जनगणनेनुसार अंबरनाथ शहराची लोकसंख्या अडीच लाख होती. सध्या ती अंदाजे सव्वातीन लाख आहे. २०२९ मध्ये शहराची लोकसंख्या साडेचार लाख होईल, हे गृहीत धरून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या अंबरनाथ शहरास प्रतिदिन एकूण ५४ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. त्यापैकी ३७ दशलक्ष लिटर्स जीवन प्राधिकरणच्या बॅरेज प्रकल्पातून, सहा दशलक्ष लिटर्स चिखलोली धरणातून तर ११ दशलक्ष लिटर्स एमआयडीसीकडून घेतले जाते. उल्हास नदीतून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना ३० दशलक्ष लिटर्स अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
नाटय़गृह, वाहनतळ
पूर्व विभागातील रेल्वे स्थानकालगत असलेले शिवाजी चौकातील य. मा. चव्हाण खुले नाटय़गृह आणि त्यापुढच्या विस्तीर्ण मैदानाच्या जागी बहुउद्देशीय व्यापारी इमारत संकुल उभारण्याचे काम सध्या अतिशय संथगतीने सुरू आहे. मूळ योजनेनुसार तळमजल्यावर वाहनतळ, पहिल्या मजल्यावर खुले नाटय़गृह आणि वाचनालय तसेच इतर पालिका कार्यालये होणार होती. आता या आराखडय़ात बदल करण्यात आला असून त्यात काही व्यापारी गाळे काढले जातील. तसेच खुल्या नाटय़गृहाऐवजी बंदिस्त नाटय़गृह होणार आहे. पालिका प्रशासन येत्या वर्षभरात हा प्रकल्प मार्गी लागेल असा दावा करीत असले तरी कामाची कासवगती पाहता प्रकल्प आणखी रखडण्याचीच चिन्हे अधिक आहेत.
भुयारी गटार आणि काँक्रीट रस्ते
धरणाप्रमाणेच काँक्रीटचे रस्ते हे अंबरनाथचे वैशिष्टय़ ठरू शकतात. किंबहुना इतर नगरपालिकांसाठी ते पथदर्शी ठरू शकतात. पालिकेचा निधी, एमएमआरडीए आणि दलित वस्ती सुधारणा योजनेतून रस्त्यांची ही कामे केली जात आहेत. अर्थात हे काम अर्धवट अवस्थेत असून त्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. शहरात एकूण १९८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहराला जोडणारे सर्व अंतर्गत रस्ते काँक्रीटचे करण्याची योजना आहे. त्यासाठी एमएमआरडीएकडून ५० कोटी रुपयांचा निधी मागितला आहे. शहरात १२६ कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. सध्या या योजनेपैकी ८० टक्क्यांहून अधिक काम झाले असून येत्या जानेवारी महिन्यात ती कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. या भुयारी गटार योजनेत वडोळ येथे ४५ दशलक्ष लिटर्स तर चिखलोली येथे ९ दशलक्ष लिटर्स क्षमतेची जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. या योजनेसाठी पालिकेने एमएमआरडीएकडून ५६ कोटींचे कर्ज घेतले असून ते १५ वर्षांत फेडायचे आहे. सात टक्के दराने घेतलेल्या या कर्जाचा वार्षिक हप्ता सहा कोटी रुपयांचा आहे.
उणिवा आणि मर्यादा
लहान-मोठय़ा टेकडय़ा, वेशीबाहेरून वाहणारे लहान-मोठे नाले, हिरवी वनश्री अशा नैसर्गिक श्रीमंतीने नटलेले अंबरनाथ हे मूळचे टुमदार शहर आहे. विकास योजनांचे नीट नियोजन झाले असते, तर अंबरनाथमध्ये मुंबई परिसरातील सर्वात सुनियोजित शहर होण्याची निश्चितच क्षमता होती. मात्र दुर्दैवाने तसे झालेले नाही. अंबरनाथचे क्षेत्रफळ ३७.५० चौरस किलोमीटर आहे. आता दूपर्यंत नागरी वसाहती होऊ लागल्या आहेत, मात्र अद्याप शहरांतर्गत दळणवळणासाठी रिक्षाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. रिक्षा वाहतूकही मीटरविना सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूंना गर्दीच्या वेळी होणारी वाहनांची अभूतपूर्व कोंडी हा सध्या चिंतेचा विषय आहे. काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले असले तरी अद्याप बऱ्याच रस्त्यांचे काम बाकी आहे. कचरा ही या शहराची मोठी समस्या आहे. सध्या शहरात दररोज ९० टन कचरा होतो. याशिवाय मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने २० टन डेब्रिजही शहरात ठिकठिकाणी आढळतो. विद्यमान क्षेपणभूमीची क्षमता संपली आहे. चिखलोलीत नव्या क्षेपणभूमीसाठी शासनाकडून जागा मिळाली असली तरी हा प्रकल्प अद्याप केवळ कागदावर आहे.
पर्यटनालाही वाव
मनोरंजनाच्या बरोबरीनेच निसर्गाची देणगी लाभल्याने अंबरनाथ व बदलापूरच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात धबधबे, ट्रेकिंग आदींसाठी बाहेरून मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. येथील कोंडेश्वर काहीसे धोकादायक असल्याने सध्या चर्चेत असले तरी येथे अनेक पर्यटक आपली पावसाळी पर्यटनाची हौस भागविण्यासाठी येत आहेत. तसेच, या भागात सध्या कृषी पर्यटनालाही महत्त्व येत आहे. ग्रामीण भागातील फार्म हाऊससारखी खासगी घरे घरमालक पर्यटनासाठी भाडय़ाने देत असल्याने अनेक पर्यटक अशा ठिकाणांना आवर्जून भेट देऊ लागले आहेत.

First Published on August 28, 2015 12:53 pm

Web Title: badlapur center point of 4th mumbai
टॅग Badlapur City