20 October 2020

News Flash

बदलापूरजवळील चोणचा तलाव गाळात; बारमाही जलस्रोताची दुर्दशा

गावात पाणी पुरवठा करण्यासाठी बारवीच्या प्रवाहातून पाणी उचलले जाते.

दुष्काळातील दुर्लक्षित जलसाठे

राज्यात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जलसिंचनाचा बोजवारा उडाल्याची सर्वदूर चर्चा सुरूआहे. मात्र त्याचवेळी अनेक तलाव आणि विहिरी या दुर्लक्षित राहिल्याने हक्काचे जलस्त्रोत वाया जात आहेत. याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना प्रशासनाचे. त्यामुळे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळते आहे. बदलापूरजवळच्या चोण गावात एक मोठा तलाव असून परिसरातील पंचक्रोशीची तहान त्यामुळे भागू शकेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

बदलापूरपासून मुरबाड रस्त्यावर आठ किलोमीटरवर चोण हे गाव आहे. बाराशे लोकवस्तीच्या या गावात सुमारे १४ एकरचा मोठा तलाव आहे. या तलावात एक विहीर आणि तलावाला लागूनच दोन विहिरी आहे. दोन्हीही विहिरांना आता एप्रिल महिन्यातही पाणी आहे. एका विहिरीला गावात येणाऱ्या जलवाहिनीतून माध्यमातून काही प्रमाणात पाणी देण्यात येते. मात्र तलाव गाळाने भरला असल्याने त्याची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे.

आठ-दहा वर्षांपासून या तलावाचा वापर करणे नागरिकांनी बंद केले आहे. काही वर्षांपूर्वी याचा वापर पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत म्हणून केला जायचा, असे गावातील जुने जाणते लोक सांगतात. मात्र नंतरच्या काळात फक्त गुरांना पाणी पिण्यासाठी याचा वापर केला जाऊ  लागला. आता पाणीच नसल्याने गुरांनाही येथे पाणी पिता येत नाही.

त्यामुळे या तलावातील गाळ काढण्याची गरज आहे. तलावातील गाळ काढल्याने त्याची साठवण क्षमताही वाढेल. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासही मदत होईल. सध्या गावात चार विहिरी आहेत. त्यातील तीनच विहिरी उपयोगात आहेत.

गावात पाणी पुरवठा करण्यासाठी बारवीच्या प्रवाहातून पाणी उचलले जाते. यात प्रचंड पैसा, वीज आणि वेळ खर्च होतो. मात्र तलावाचा वापर केल्यास दुसरीकडून पाणी आणण्याची गरज पडणार नाही, असे ग्रामस्थ सांगतात. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात उद्भविणारा पाणी प्रश्नही सुटेल.

या गावासह आसपासच्या गावांचीही तहान भागवण्याची क्षमता या तलावाची आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्रामस्थ समीर देशमुख यांनी सांगितले. तसेच याबाबत शासन दरबारी प्रस्ताव पाठवला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य भरत देशमुख यांनी सांगितले.

त्यामुळे किमान येत्या पावसाळ्याआधी तरी येथील तलावाचा गाळ काढून त्याची खोली वाढवावी व  पावसाळ्यात पाणी साठवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात व्हावी, अशी अपेक्षा अनेकजण व्यक्त करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 1:48 am

Web Title: badlapur chonwa lake
Next Stories
1 डोंबिवली पश्चिमेला वाहतूक पोलिसांना घाबरतो कोण?
2 गुन्हे वृत्त : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
3 ‘झोपु’ प्रकल्पाची सुरुवातही वादग्रस्त
Just Now!
X