शासनाने बदलापूर पालिका प्रशासकीय इमारत आणि नाटय़गृहासाठी तब्बल १४ कोटी १४ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गेली अनेक वर्षे पालिकेचे कार्यालय भाडय़ाच्या जागेत आहे. निधी मिळाल्याने तो प्रश्न मार्गी लागेलच, शिवाय सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या शहरात लवकरच सुसज्ज नाटय़गृहही उभारले जाणार आहे.  
राज्य शासनाने राज्यातील एकूण १३ पालिकांसाठी ५१ कोटी ९४९ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. त्यात बदलापूर पालिकेला सर्वात जास्त १४ कोटी १४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर, अन्य पालिकांना केवळ १ ते पाच कोटी रूपयांवरच समाधान मानावे लागले आहे.    निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची ही पूर्ती असल्याचे बोलले जात आहे. संबंधित निधी खर्च करण्यासाठी आणि कामावर लक्ष ठेवण्यासाठी त्या त्या जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली असून ही समिती चार जणांची असणार आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता, पालिकेचे मुख्याधिकारी व नगर प्रशासनाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी यांचा समावेश आहे, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
गेले काही दिवस आमदार कथोरे या प्रकल्पांसाठी जातीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते. हा निधी मंजूर झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जाते.
 पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी निधी मंजूर झाल्याच पत्र शासनाकडून आले असल्याचे सांगितले. पूर्व विभागात कात्रप परिसरात पाच विकास कामांसाठी आरक्षण मंजूर असलेले भूखंड आहेत. प्रशासकीय इमारत आणि नाटय़गृह यासाठी या जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नगररचनाकारांना देण्यात आले असून त्यांचा लवकरच अहवाल मागविण्यात येणार आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे विषय पालिकेच्या सभेत सादर करून सर्वानुमते त्याला मंजुरी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.