नगरपालिकेच्या वतीने ३१ मार्चपर्यंत शहरात ३,६०६ शौचालयांची उभारणी
कुळगांव-बदलापूर नगरपालिका आता लवकरच हागणदारीमुक्त पालिका होणार असून शहरात जागोजागी स्वच्छतागृहे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छतागृहांच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. या कामासाठी राज्य तसेच केंद्र सरकारकडून नगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. येत्या ३१ मार्च २०१६ पर्यंत नगरपालिका ही शौचालये बांधून पूर्ण करणार आहे.
बदलापूर नगरपालिका हद्दीत अजूनही अनेक कुटुंबांना शौचालयाअभावी उघडय़ावर शौचाला जावे लागते. अनेक कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. यावर तोडगा म्हणून स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही त्यांच्यासाठी शौचालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाने मिळून १ कोटी ९ हजार रुपयांचा निधी यासाठी नगरपालिकेला दिला आहे. एका शौचालयासाठी त्याच्या टाकीसह १२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी केंद्राकडून ४ हजार, राज्य शासनाकडून ८ हजार तर पालिकेकडून ३ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

इको टॉयलेट अ‍ॅप
ही संपूर्ण शौचालये बांधून झाल्यावर त्याची नोंद पालिकेकडे रहावी व भविष्यात या शौचालयांच्या मालकीवरून वाद झाल्यास त्याची माहिती पालिककेडे असावी यासाठी पालिकेने इको टॉयलेट हे अ‍ॅप विकसीत केले आहे. या प्रत्येक शौचालयाचे जिओ टॅगींग करण्यात येणार असून त्याची माहिती या अ‍ॅपवर पालिकेला उपलब्ध होणार आहे. मात्र, हे अ‍ॅप फक्त पालिकेलाच वापरता येणार आहे.

नगरपालिकेचे सर्वेक्षण
बदलापूर नगरपालिकेने स्वच्छतागृहांसाठी शहरातील ७२ हजार ६२७ कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे. त्यातील ३६०६ कुटुंबांकडे स्वतचे शौचालय नसल्याचे दिसून आले आहे. त्यातील ६७६ कुटुंबे उघडय़ावर शौचास जात असून उर्वरित कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. त्यामुळे या ६७६ कुटुंबांसाठी नगरपालिका प्राथमिकतेने शौचालये बांधणार आहे. या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून २० शौचालये बांधून झाली आहेत. ही शौचालये बदलापूर पूर्वेकडील मोहपाडा या पाडय़ावर बांधून झाली आहेत, तर उर्वरित शौचालयांचे काम प्रगतिपथावर आहे.

येत्या ३१ मार्चपर्यंत शहरातील ३ हजार कुटुंबांना हक्काची शौचालये मिळणार आहेत. त्यामुळे शहरात उघडय़ावर अथवा सार्वजनिक शौचालयात नागरिकांना जाण्याची आवश्यकता उरणार नाही. यांमुळे शहर स्वच्छतेत मोठी भर पडणार आहे. सध्या जे उघडय़ावर शौचाला जातात त्यांना हटकण्यासाठी पालिकेने गुड मॉर्निग पथकाची नेमणूक केली असून हे पथक सकाळपासूनच उघडय़ावर शौचाला जाणाऱ्यांना अटकाव करते व घरात शौचालय नसल्यास सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यास सूचित करते.
-भाऊ निपुर्ते, आरोग्य विभाग प्रमुख, कुळगांव-बदलापूर नगरपालिका