केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ‘अमृत’ योजनेत राज्यातील ४३ नगरपालिकांची निवड करण्यात आली आहे. त्यात बदलापूर नगरपालिकेचा समावेश झाला असून यातून पालिकेला स्वत:चे पाणीपुरवठा नियोजन, सांडपाणी व्यवस्थापन, पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन, उद्याने व मुख्य म्हणजे परिवहन सेवा आदींची उभारणी करता येणार आहे. शहरातील भुयारी गटार योजना, ३८०० घरांची महत्त्वाकांक्षी अशी बीएसयूपी योजना, प्रशासकीय इमारत, नाटय़गृह, महत्त्वाकांक्षी बोटॅनिकल गार्डन असे प्रकल्प सध्या शहरात होत आहेत. परंतु भ्रष्टाचार व लालफितीचे ग्रहण लागल्याने हे प्रकल्प सध्या कूर्मगतीने आगेकूच करत आहेत.
शहराची हद्दवाढ
वाढत्या शहराला आता शहराच्या हद्दवाढीची साथ देण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन असून याचे सूतोवाच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापुरात केले. यात बदलापूरच्या आजूबाजूला आसणारी राहटोली, आंबेशिव तर पूर्वेला भोज, दहिवली, बेंडशिळ आदी गावे शहर हद्दीत आणण्याच्या शासन विचाराधीन आहे.
क्षेपणभूमींचा प्रश्न गंभीर
अंबरनाथ व बदलापूर या शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे या शहरांमधील कचराही वाढू लागला आहे. त्यामुळे दोन्ही शहरांच्या क्षेपणभूमी या कचऱ्याने वाहू लागल्या आहेत. त्यातच लोकसंख्या विस्फोटामुळे गृहप्रकल्प आता या शहरातील क्षेपणभूमीला खेटू लागले आहेत. बदलापुरात पश्चिमेला वडवली या शहराच्या वेशीवरील गावावर बदलापूर पालिकेची क्षेपणभूमी असून येथे शहरातून दररोज ६३ टन कचरा जमा होतो, तर अंबरनाथमधील चिखलोली येथे अंबरनाथ पालिकेची क्षेपणभूमी असून येथे अंबरनाथमधून तब्बल ९० टन कचरा दररोज जमा होत आहे. मुख्य म्हणजे बदलापुरातील वडवली गाव व अंबरनाथमधील चिखलोली गाव ही गावे या दोन्ही शहरांच्या वेशीवर असून या दोन्ही पालिकांचा कचरा या गावांच्या ठिकाणी पडल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.

अंबरनाथ-बदलापूरमधील घरांच्या किमती
२००४/२००५    ५५० ते ७०० रु. प्रति चौरस फूट
२००६/२००७     ६०० ते ८०० रु. प्रति चौरस फूट
२००८/२००९      ७०० ते ९०० रु. प्रति चौरस फूट
२०१०/२०११       १८०० ते २४०० रु. प्रति चौरस फूट
२०१२ ते २०१३    २३०० ते ३८०० रु. प्रति चौ. फू.
२०१४ ते २०१५    २७०० ते ४००० रु. प्रति चौरस फूट
सौजन्य- पॅनमार्कस् लाइफस्केप्स्