योग्य नियोजन केल्याने अधिकाऱ्यांचे कौतुक

ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बदलापूर शहरात पाण्याचे योग्य नियोजन सुरू असल्याचा दावा केला जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये टंचाईच्या काळात पाण्याच्या वेळेचे योग्य नियोजन केले जात असल्याचे चित्र असून, यामुळे अनेक टंचाईग्रस्त भागांतही योग्य दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ठाण्यापासून कल्याणपर्यंत प्रमुख शहरांना तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. बारवी धरणातील पाणीसाठा कमालीचा रोडावल्यास कल्याण- डोंबिवली शहराला पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. अंबरनाथ शहरातील पाणीप्रश्न थेट उच्च न्यायालयात पोहोचला होता. नवी मुंबईसारख्या स्वत:च्या मालकीचे धरण असलेल्या शहरातही मोठी पाणीकपात करण्यात आली आहे. एकीकडे हे चित्र दिसत असताना बदलापूर शहर तीव्र पाणीटंचाईला अपवाद ठरत आहे. मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाचे अनुकूल परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता डी.एन. बागूल यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाणी गळती थांबविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, टंचाईग्रस्त भागांमध्येही योग्य स्वरूपाचा पाणीपुरवठा केला जात आहे, असा दावा जीवन प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी केला. या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्राधिकरणाचा दावा

शिरगांव – कात्रपसारख्या या पूर्वेकडील अतिटंचाईग्रस्त भागात प्राधिकरणाने पाण्याचे विशेष नियोजन आखले होते. त्यानुसार या भागात पाण्याचे समप्रमाणात वितरण करण्यात यश मिळत आहे.

शहरातील माझा कार्यकाळ खूप कमी आहे. मात्र शहरातील पाणीप्रश्नी सहकाऱ्यांसोबत नियोजन केल्याने टंचाईची झळ शहराला बसली नाही. समस्यांचे दीर्घकालीन परिणामांचा विचार करत काम केल्याने शहराला आज पुरेसे पाणी मिळते आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पाणीप्रश्नी एकही मोर्चा कार्यालयावर आला नाही, हेच आमचे यश आहे.

 दिलीप बागूल, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.