बदलापूर : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला असून त्याचा मोठा फटका बदलापूर शहराला बसला. बदलापूर पश्चिमेतील मोहनानंद नगर, शनिनगर, हेंद्रेपाडा, रमेशवाडी, दुबे बाग, बॅरेज रस्ता, तर पूर्वेतील खरवई आणि उल्हास नदीकिनारी असलेल्या विविध भागांमध्ये पाणी साचले. मध्यरात्रीच उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापुरात हाहाकार उडाला. या पुरामुळे शेकडो कुटुंबांची वाताहत झाली. नदीकिनारी असलेला बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गही पाण्याखाली गेल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली.

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारपासूनच बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर तसेच नदीकिनारी असलेल्या गावांतील अनेक भाग जलमय होत असल्याचे चित्र होते. बुधवारी सायंकाळनंतर या पावसाने जोर धरल्याने मध्यरात्रीपासूनच उल्हास नदीने आपली इशारा पातळी ओलांडली होती. पहाटे चारच्या सुमारास उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडण्यास सुरुवात केली. त्यामुळे बदलापूर शहरातील नदीकिनारीच्या आणि मुख्य नाल्याशेजारच्या भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.

सकाळी ९ वाजेपर्यंत बदलापूर पश्चिमेतील पूररेषेत मोडणारे दुबे बाग, मोहनानंद नगर, हेंद्रेपाडा, रमेशवाडी, समर्थनगर, बॅरेज रस्ता, नदीकिनारचा परिसर पाण्याखाली गेला. या भागात काही ठिकाणी पाच ते सहा फुटांपर्यंत पाणी होते, तर शहरातल्या सर्वात मोठय़ा नाल्याच्या शेजारी असलेल्या अनेक भागांतील इमारतींचे तळमजले पाण्यांनी व्यापले गेले होते. त्यामुळे पहाटेपासूनच पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी येथील रहिवाशांची धावपळ सुरू होती. अनेक तळमजल्यावरच्या रहिवाशांनी आपले मौल्यवान साहित्य वरच्या मजल्यावर हलवले. त्यात अनेक नागरिकांची तारांबळ पाहायला मिळाली. या भागात असलेल्या अनेक किराणा दुकानांमध्ये पाणी गेल्याने लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे.

बदलापूर पूर्वेतील खरवई, होप इंडिया या भागातही पुराचे पाणी साचले होते. येथील नागरिकांनाही या पाण्याचा मोठा फटका बसला. उल्हास नदीकिनारी असलेल्या चामटोली, कासगाव आणि वांगणी परिसरालाही या पुराचा मोठा फटका बसला. या काळात कर्जत-बदलापूर राज्यमार्गावर पाणी साचल्याने या भागातील वाहतूक ठप्प होती.

३५ जणांची सुटका

चामटोली भागात रेल्वे रुळाच्या कडेला असलेल्या पाणवठा या अनाथ प्राण्यांच्या आश्रमाला या पुराचा फटका बसला. मध्यरात्री पाण्याचा अंदाज न आल्याने संस्थेतील सदस्य आश्रमातच थांबले. त्यामुळे सुमारे ७० प्राणी आणि ११ लोक यात अडकून पडले होते. राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाच्या जवानांनी पाच जणांची सुटका केली, तर इतरांनी बाहेर येण्यास नकार दिल्याची माहिती नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी दिली. अंबरनाथ आणि बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बॅरेज बंधाऱ्यातील पाणी उचल केंद्रातील १५ कर्मचारी पुराच्या पाण्यात अडकले होते, तर एरंजाड भागात उल्हास नदीकिनारी असलेल्या उच्चभ्रू बंगला संकुलात १५ रहिवासी अडकले होते. या ३० जणांना वाचवण्यास यश आले.