X

बदलापूर-कर्जत महामार्गाची दुरुस्ती होणार

अखेर गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता हस्तांतरित करून घेतला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेस सुरुवात; दिवाळीनंतरच दुरुस्तीला सुरुवात

बदलापुरातून जाणाऱ्या जुन्या पुणे महामार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुरवस्था झाली असून या मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांतून मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागात पुरेसा समन्वय नसल्याने या महत्त्वाच्या रस्त्याची दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी घेतली असून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीसाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची चिन्हे असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची दिवाळीही खड्डय़ातच जाणार अशीच चिन्हे आहेत.

पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी कोंडीविरहित मार्ग म्हणून बदलापुरातून जाणाऱ्या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचा राबता वाढू लागला आहे. बदलापूर-कर्जत या मार्गावरून थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर या रस्त्याद्वारे पोहोचता येत असल्याने अलीकडच्या काळात अंबरनाथ-बदलापूरच नव्हे, तर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर तसेच आसपासच्या भागांतून पुण्याकडे ये-जा करू इच्छिणारे प्रवासी या मार्गाचा वापर करू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरल्याने येथील प्रवास खडतर झाला आहे. होप इंडिया कंपनीपासून सुरू झालेल्या या रस्त्यावर सुरुवातीपासूनच मोठे खड्डे पाहायला मिळतात. पुढे चामटोली, कासगाव, वांगणीला पोहोचेपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पाहायला मिळतात. त्यामुळे वाहनचालकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत येथे स्थानिक रहदारीही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मात्र या खड्डय़ांमुळे स्थानिकांसह बाहेरील वाहनांनाही येथे प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.

जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात असून त्यामुळे अपघात घडू लागले आहेत. तसेच मोठय़ा वाहनांनाही या खड्डय़ांचा त्रास होत असून अनेकदा गाडीचे भाग निकामी होत असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहने चालविणे जिकिरीचे होत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, ही मागणी एकीकडे जोर धरत असताना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही जबाबदारी नेमकी कुणाची यावरून मुंबई विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागात मतभेदांना सुरुवात झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्याचे ठरविले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता घेण्यात उत्सुक नसल्याचे समोर आले होते.

अखेर गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता हस्तांतरित करून घेतला आहे. याबाबत ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये सचित्र वृत्तांकन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली होती. त्यानंतर अखेर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवली जाते आहे. त्यासाठी ७९ लाखांची निविदा काढण्यात आली आहे. यात बदलापूर ते डोणे या दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे.

  • Tags: Badlapur Karjat highway,
  • Outbrain