भोज धरणातून ६ दशलक्ष लिटर जादा पाणी मिळण्याची शक्यता
आधीच कपात आणि त्यानंतर कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे त्रस्त असलेल्या बदलापूरकरांना पाणी कपातीतून काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बदलापूर शहराला भोज धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाटबंधारे विभाग पावले उचलत असून, एका कराराद्वारे बदलापूरला अतिरिक्त ६ दशलक्ष लिटर पाणी मिळू शकणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
जलसंपदा विभागाने ५ फेब्रुवारीपासून बदलापुरात दर शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत बदलापूरात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद केला आहे. या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले. मात्र सलग ४८ तास पाणीपुरवठा बंद असल्याने सोमवारच्या पाणीपुरवठय़ावरही त्याचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ४८ तासांच्या कपातीचा बदलापूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात ही पाणी कपात सलग ४८ तास न करता आठवडय़ातील दोन वेगवेगळ्या दिवशी २४-२४ तासांची करण्याचेही विचाराधीन असल्याचे कळते आहे.

लवकरच करार

तसेच या पाश्र्वभूमीवर भोज धरणातील पाणी बदलापूरकरांना उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाटबंधारे विभाग यांच्यात करार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. या कराराद्वारे बदलापूरला दररोज ६ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. हे दोन्ही निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही अंशी काही होईना बदलापूरकरांना दिलासा मिळणार आहे.

कपात नेमकी किती?
बदलापूर आणि अंबरनाथ शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उल्हास नदीतून दररोज ९० दशलक्ष लिटर पाणी उचलत असते. मात्र शुक्रवारी मध्यरात्री १२ पासून ते रविवारी मध्यरात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवल्याने ३० टक्के पाणी कपात होते. त्याचप्रमाणे दररोज ९ दशलक्ष लिटर पाणी कमी उचलल्याने आणखी दहा टक्के पाणी कपात होते. अशा प्रकारे एकूण ४० टक्के पाणी कपात केली जाते.