कुळगांव-बदलापूर नगरपालिकेने फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. यात रेल्वेस्थानक परिसरातील हातगाडय़ा, टपऱ्या आणि फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली.
बदलापूर शहराचा रेल्वे स्थानकालगतचा परिसर हा गजबजलेला असतो. पश्चिम भागात जुनी बाजारपेठ असून पूर्व भागात चौक आहे. पूर्वेकडील भागात स्थानकाच्या बाहेर गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून वडापावच्या हातगाडय़ा आणि काही टपऱ्या वसलेल्या होत्या. या भागात फळवाले, किरकोळ विक्रेते बसत होते.
पश्चिम भागात बाजारपेठच असल्याने या बाजारपेठेबाहेर भाजीवाले रस्त्यावर बसत असत. त्यांच्यावरही बदलापूर पालिकेतील सत्ताधारी पक्षाने प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी काही अतिक्रमणे हटवण्यात आली.
बदलापूर पूर्व व पश्चिम भागात मिळून पालिकेने गेल्या दोन दिवसांत ६० फेरीवाले व १० हातगाडय़ा व ३ टपऱ्यांवर ही कारवाई केली आहे. अशी माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे श्रीकांत जोशी यांनी दिली.
दरम्यान, संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. यात दुकानापुढील पदपथांवर माल ठेवणाऱ्या दुकानदारांवरही पालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कात्रप भागातील पाच दुकानदारांवर पदपथांवर माल ठेवल्याप्रकरणी कारवाई केली आहे. असे जोशी या वेळी म्हणाले.
वाहतूक कोंडीचे काय?
रेल्वे स्थानक परिसर गजबजलेला असल्याने येथे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. यात फेरीवाले आणि दुचाकींच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. फेरीवाले हटवल्याने वाहतुकीतील एक अडथळा गेला असला तरी पार्किंगचा प्रश्न कायम आहे. याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या वेळी केला आहे.