तीन महिन्यांत तीन दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा

तीन महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या बदलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बदलापुरात अग्निशमन दल मुख्यालय आणि जीवन प्राधिकरणाच्या पाणी केंद्रातून साडेचार हजारपेक्षा अधिक टँकरद्वारे लाखो लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे टँकरमधून दिले जाणारे पाणी थेट नळातून का दिले जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे रविवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी दुपापर्यंत पाणी उचल बंद ठेवण्यात येते. याचा परिणाम मंगळवार आणि बुधवारी होणाऱ्या पाणीपुरवठय़ावर होताना दिसतो आहे. बॅरेज बंधाऱ्यातून उचलल्या जाणाऱ्या पाण्याची पातळी काही दिवसांपासून कमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरात आठवडाभर कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो. त्यावर पर्याय म्हणून शहरात कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रातून आणि जीवन प्राधिकरणाच्या शुद्धीकरण केंद्रातून शहराला लागणाऱ्या पाण्याचा टँकरद्वारे शुल्क आकारून पुरवठा करण्यात येतो.

पाणी कपातीनंतर साडेचार हजारांहून अधिक टँकरने लाखो लिटर पाण्याचा पुरवठा शहरात केला गेल्याचे समोर आले आहे. या दोन्ही केंद्रांवरून नोंदणी केलेल्या टँकरची संख्या ४ हजार ५५० आहे.

बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीतील या केंद्रावरून १ हजार ६७१ टँकर पाणी शहरात वितरित करण्यात आले आहे. यात ६१० रुपये किमतीच्या ८ हजार लिटरच्या १ हजार २७१ टँकरचा समावेश आहे. तर ८०० रुपये किमतीच्या १० हजार लिटरच्या ४२० टँकरचा समावेश असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख रमेश पाटील यांनी दिली.

तर औद्योगिक वसाहतीतील जीवन प्राधिकरणाच्या केंद्रावरून दिवसाला ४० प्रमाणे तीन महिन्यांत तीन हजारांहून अधिक टँकरद्वारे तीन दशलक्ष लिटर पाणी टँकरद्वारे देण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत या दोन्ही केंद्रांवरून जवळपास साडेचार दशलक्ष लिटर पाणी टँकरद्वारे विकण्यात आले आहे. त्यापोटी लाखो रुपयांचे उत्पन्न टँकर मालक आणि पाणीपुरवठा केंद्रांना करण्यात आला आहे.