News Flash

बदलापूरचा ‘टीव्ही टॉवर’ इतिहासजमा होणार

दूरदर्शनच्या प्रक्षेपण केंद्राची सेवा ३१ मार्चनंतर बंद

बदलापूरचा ‘टीव्ही टॉवर’ इतिहासजमा होणार
(संग्रहित छायाचित्र)

सागर नरेकर

नव्वदीच्या दशकात बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांपर्यंत दूरदर्शनची सेवा पोहोचवणारे ‘टीव्ही टॉवर’ अर्थात लघुशक्ती प्रक्षेपण केंद्र येत्या ३१ मार्चपासून बंद केले जाणार आहे. उपग्रहांद्वारे दिली जाणारी सेवा आणि डीटीएच माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जात असल्याने प्रसारभारतीने प्रादेशिक सेवा देणारी देशभरातील अनेक केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बदलापूरच्या केंद्राचा समावेश आहे.

एकेकाळी दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात दूरदर्शनचे अनन्यसाधारण महत्त्व होते. मात्र, आता उपग्रहांद्वारे दिली जाणारी सेवा आणि केबल क्षेत्राच्या विकासामुळे दूरदर्शन मागे पडले. गेल्या काही वर्षांत डीटीएच आणि इंटरनेटमुळे दूरचित्रवाणी प्रेक्षकाच्या हातातल्या मोबाइलमध्ये आली आहे. त्यामुळे प्रसारभारतीच्या माध्यमातून कार्यान्वित असलेले आणि अल्युमिनियमच्या अँटेनाच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेले दूरदर्शन कालबाह्य़ झाले आहे. नव्वदीच्या दशकात प्रादेशिक सेवा देण्यासाठी दूरदर्शनच्या मुख्य केंद्रासह अनेक प्रादेशिक केंद्रे उभारण्यात आली होती. त्यात बदलापूर पूर्व येथील लघुशक्ती प्रक्षेपण केंद्राचा समावेश होता. १९९७ मध्ये या केंद्राची स्थापना कात्रप भागात करण्यात आली होती. टावळी, हाजीमलंग अशा डोंगरांमुळे कायम प्रक्षेपण लहरी बदलापुरात पोहोचण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर जिल्ह्य़ातील एकमेव असलेल्या या मनुष्यविरहित लघुशक्ती प्रक्षेपण केंद्राची उभारणी करण्यात आली होती. २००४ मध्ये या केंद्रात तंत्रज्ञाची नेमणूक करण्यात आली. अनेक वर्षे या केंद्राने बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, वांगणी, शेलू या जवळपास २५ किलोमीटरच्या परिघातील प्रेक्षकांना प्रादेशिक सेवांचा आनंद दिला. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेली उपग्रह वाहिन्यांची सेवा यामुळे ही केंद्रे निरुपयोगी झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांत अल्युनिमियमच्या अँटेनाचा वापर पूर्णपणे बंद झाला आहे. प्रसारभारतीच्या माध्यमातून दूरदर्शनही डीटीएच माध्यमातून उपलब्ध होत असल्याने अशी केंद्रे बंद करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून येत्या ३१ मार्चपासून या केंद्रावरची सेवा बंद केली जाणार आहे.

बदलापुरातील आकर्षण केंद्र

हे केंद्र बदलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या केंद्रामुळे हा परिसर टीव्ही टॉवर या नावाने ओळखळा जाऊ लागला. आजही नव्याने बदलापुरात येणारी व्यक्ती टीव्ही टॉवर नाव ऐकून ते पाहण्यासाठी येथे भेट देत असते. बदलापुरातील ही एक ठळक खूण पुसली जाणार असल्याने जुनेजाणते प्रेक्षक खंत व्यक्त करीत आहेत. तसेच अनेक जण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 12:27 am

Web Title: badlapur tv tower closes on march 31 abn 97
Next Stories
1 अ‍ॅपच्या माध्यमातून मैत्री करून तरुणीची फसवणूक
2 करोनाची दहशत: डोंबिवली, ठाण्यातील गुढीपाडव्याच्या सर्व शोभायात्रा रद्द
3 अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांवर करआकारणी
Just Now!
X