चित्रपटातील व्यक्तिरेखेची छाप

एखादा चित्रपट लोकप्रिय झाला की त्यातील फॅशन लगेच बाजारात येते. मग ती केशभूषा, वेशभूषा किंवा दागिन्यांची असो. बाजीराव मस्तानी या चित्रपटाभोवती विविध कारणांमुळे वाद उभे केले जात असले तरी चित्रपट बारीवर चांगला गल्ला जमवत असल्याचे सध्याचे चित्र आहे. या चित्रपटात रणवीर सिंग याने साकारलेल्या बाजीरावच्या व्यक्तीरेखेची तरुणांवर भुरळ पडू लागली असून पिळदार मिशा, दाढी ठेवण्याचा ट्रेण्डच अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे.

या चित्रपटातील काशी व मस्तानीच्या व्यक्तिरेखेची छाप तरुणींवर पडली असली तरी त्याच तोडीला बाजीरावची देहबोली, त्याचे व्यक्तिमत्त्व लोकप्रिय होताना दिसत आहे. ‘मुछे हो तो नथ्थुलाल जैसी’ हा अमिताभ बच्चनचा शराबी चित्रपटातील डायलॉग एकेकाळी गाजला. बाजीराव-मस्तानी चित्रपटात रणवीरने ठेवलेल्या पिळदार मिश्यांची भुरळ तरुणांना पडू लागली आहे. महाविद्यालयीन तरुण बाजारातील फॅशन लगेच उचलतात असे साधारण चित्र नेहमी दिसत असले तरी रणवीरचा बाजीराव मात्र महाविद्यालयांसोबतच कायालयांमध्येही झळकू लागला आहे. नोकरदार मध्यमवयीन तरुणही बाजीराव सारख्या मिश्या ठेवून मोठय़ा ऐटीत इतरत्र वावरताना दिसू लागले आहेत. महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या महोत्सवात पारंपरिक वेशभूषा दिनाला अनेकांनी बाजीरावचा वेश परिधान करण्यास प्राधान्य दिले होते.

बाजीरावची केवळ वेशभूषा उठावदार नाही तर त्याची एकूणच देहबोली, त्याचे व्यक्तिमत्त्व आम्हा तरुणांना भावली आहे, अशा प्रतिकिया महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये उमटताना दिसत होत्या. रणवीर सिंगने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे असे वाटते. त्याने नक्कीच त्यासाठी मेहनत घेतली असेल. परंतु यामुळे बाजीराव पेशवे नक्की कसे होते, ही एक प्रतिमा तुमच्या मनात तयार होत असते. बाजीरावच्या मिशाच नाहीत तर चित्रपटातील त्यांचे संवादफेकही काही तरुणांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याविषयी मयुरेश गुंजाळ म्हणाला, केवळ चित्रपट म्हणून आम्ही त्याकडे पाहिले होते, त्यातून आम्हाला बाजीराव भावले. आमच्या ग्रुपमधील सर्व मुलांनी एकसारख्या मिशा ठेवल्या आहेत, असेही त्याने सांगितले.

एका मोठय़ा आयटी फर्ममध्ये काम करणाऱ्या आशीष पाटील यानेही अशाच पिळदार मिश्या ठेवल्या आहेत. मी एका खाजगी कंपनीत मॅनेजर पदावर काम करतो. त्या ठिकाणी तुम्ही कशा मिशा ठेवता यावर काही नियम नाही. परंतु आपल्या कामाचे स्वरूप पाहता त्यानुसार वेशभूषेला महत्त्व दिले जाते. बाजीराव चित्रपटात रणवीरने ठेवलेल्या मिशा या अस्सल मराठमोळ्या पेशव्याची एक झलक आहे आणि ती कोणत्याही पेहरावावर उठून दिसते. यामुळे तुमचा लुकही चांगला दिसतो, असे पाटील याने सांगितले.