उपचारातून बरे होत असलेल्या रुग्णांच्या पाककृतींना बाजारपेठ मिळवून देणार

ऋषिकेश मुळे, ठाणे</strong>

जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेऊन बरे होण्याच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या मनोरुग्णांकडून विविध बेकरी पदार्थ तयार करण्यासाठी मनोरुग्णालयात लवकरच बेकरी सुरू करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, तर या बेकरी पदार्थाना ठाण्यातील मोठय़ा मॉलमध्येही बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असून यामुळे मनोरुग्णांच्या कौशल्यवाढीस आणि कृतिशीलतेला फायदा होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्य़ात १९०१ रोजी बांधण्यात आलेल्या ठाणे मनोरुग्णालयात राज्यातून विविध भागांतून मनोरुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. अंतर्गत आणि बाह्य़रुग्णांच्या उपचारासाठी मनोरुग्णालयातर्फे विविध उपक्रम आणि शिबिरे राबवण्यात येतात. यापैकी काही मनोरुग्ण पूर्णत बरे होतात तर काही रुग्ण बरे होऊनही केवळ नातेवाईक स्वीकारत नसल्याने रुग्णालयातच राहतात. त्यामुळे औषधोपचार आणि समुपदेशन या पलीकडेही रुग्णांचा विकास व्हावा याकरिता जिल्हा मनोरुग्णालयातर्फे रुग्णालयाच्या आवारात बेकरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाकरिता आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच बेकरीच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या बेकरीत तयार करण्यात येणारे पाव, टोस्ट, खारी, बटर आणि केक हे बेकरी पदार्थ ठाण्यातील विविध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच शहरातील ग्राहकांना उत्तम दर्जाच्या आणि चवीच्या सुयोग्य बेकरी पदार्थाचा आस्वाद घेता यावा याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येणार असून पदार्थाच्या विक्रीकरिता जास्तीत जास्त चांगली बाजारपेठही खुली करण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

‘हाफ वे होम’चा प्रस्ताव

अनेकदा रुग्ण उपचारानंतर बरे होऊनही त्यांचे नातेवाईक मानसिकरीत्या बरे झालेल्या रुग्णांना घेऊन जात नाही. तर काहींचे नातेवाईक हयात नसतात त्यामुळे हे निराधार रुग्ण रुग्णालयातच वास्तव्यास असतात. त्यामुळे अशा रुग्णांनी कौशल्यपूर्ण आणि कृतिशील राहून आर्थिक उन्नती करावी समाजात त्यांचे स्थान निर्माण व्हावे याकरिता ‘हाफ वे होम’चे उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय बोदडे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत राखी बनवणे, फाईल बनवणे, कापडी पिशव्या बनवणे यासारखी कामे मनोरुग्णांकडून करून घेण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव देखील शासनाला पाठवण्यात आलाआहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कार्यालयात कामकाजाकरीता इतर खासगी ठिकाणांहून फाईली विकत न घेता मनोरुग्णालयात तयार करण्यात येणाऱ्या फाईली विकत घेण्याचे निवेदनही जिल्हा प्रशानास देण्यात येणार असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सध्या ठाणे जिल्हा मनोरुग्णालयात ११५० अंर्तगत रुग्ण ४५० बाह्य़रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांचा सर्वागीण विकास व्हावा याकरिता बेकरी आणि ‘हाफ वे होम’ प्रकल्पांचे प्रस्ताव आरोग्य प्रशासनाला पाठवण्यात आले आहेत. हाफ वे होम उपक्रमातील रुग्णांना बरे झाल्यानंतर त्यांची वास्तव्याची सोय वृद्धाश्रम तसेच इतर ठिकाणी करण्यात येणार आहे.

– डॉ. संजय बोदडे, अधीक्षक- ठाणे मनोरुग्णालय