बालाजी गार्डन, कोपर रोड स्थानकाजवळ, डोंबिवली.
tvm3डोंबिवलीचे एक उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या कोपर रोड स्थानक परिसरातील १५ मजली टॉवरचा समूह म्हणजे बालाजी गार्डन वसाहत. वरवर पाहता कॉलनी अगदी पॉश वाटत असली तरी येथील रहिवाशांना अगदी प्राथमिक सुविधांसाठीही संघर्ष करावा लागतोय. कोणतीही गोष्ट दुरून खूप छान दिसते. मात्र जवळून पाहिली की त्यातील उणेपण नजरेत भरते. बालाजी गार्डनलाही ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण लागू पडते.
कोपर रेल्वे स्थानकाच्या उभारणीमुळे आजूबाजूच्या भागात अनेक गृहसंकुले उभी राहिली असून काही नव्याने उभी राहत आहेत. त्यातील एक ठळक आणि जाता-येताना सहज दृष्टिक्षेपात येणारी वसाहत म्हणजे बालाजी गार्डन. कोपर पूर्व विभागात हे आलिशान गृहसंकुल आहे. अद्याप या इमारतीच्या आजूबाजूला इमारती नसल्याने येथील सदनिकांच्या बाल्कनीमधून सुंदर खाडीकिनारा, पारसिकचा डोंगर आणि मुंब्रादेवीचे दर्शन घडते. मात्र दिसते तसे नसते याचा अनुभव येथील रहिवाशांना लगेचच आला. कारण या निसर्गसौंदर्याचा अपवाद वगळता जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या नावाने वसाहतीत बोंब आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकात नागरिकांची गर्दी वाढत असल्याने त्याचे उपस्थानक म्हणून कोपर स्थानक उभारण्यात आले. कोपरला दिवा-वसई मार्गावरील उन्नत (एलिव्हेटेड) स्थानक आहे. रेल्वे स्थानक झाल्यामुळे गावठाण समजल्या जाणाऱ्या आयरे भागास जास्तच महत्त्व प्राप्त झाले. गावात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली. रेल्वे स्थानक जवळच असल्याने नागरिकांनी या संकुलांना पसंती देत घरे घेण्यास पसंती दर्शविली. त्यातूनच डोंबिवली स्थानकापासून अध्र्या तासावर तसेच कोपर स्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर बालाजी गार्डन हे गृहसंकुल २००९ मध्ये उभे राहिले. या संकुलात प्रत्येकी १५ मजली आठ टॉवर आहेत. यात वन बीएचके ते थ्री बीएचके फ्लॅटची सुविधा आहे. मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांनी ठाण्यापासून थोडे लांब असले तरी निसर्गाच्या सान्निध्यामुळे येथे घर घेतले. सर्वसामान्य लोकांपासून उच्चवर्गीय नागरिकही येथे वास्तव्य करीत आहेत. सुरुवातीला या रहिवाशांना १८ ते ३० लाखांत घरे मिळाली. सध्या याच फ्लॅटची किंमत ४० लाखांपासून ते ८० लाखांच्या घरात गेली आहे. संकुलात जलतरण, अ‍ॅम्पी थिएटर, व्यायामशाळा, ग्रंथालय, क्रीडांगण, लॅण्डस्केप, गार्डन अशा अत्याधुनिक सुविधा मिळाल्या असल्या तरी मूलभूत सुविधांपासून मात्र या नागरिकांना आतापर्यंत वंचित राहावे लागले आहे.
आरोग्य सुविधांचा अभाव
येथे आरोग्यविषयक सोयीसुविधा नाहीत. महानगरपालिकेचा दत्तनगर प्राथमिक दवाखाना आहे. मात्र तोही डोंबिवलीत आहे. छोटेमोठे खासगी दवाखानेही येथे जवळपास नाहीत. त्यामुळे काही दुखलेखुपले तर येथील रहिवाशांना थेट डोंबिवलीच गाठावे लागते. रात्रीच्या वेळेस अचानक जर डॉक्टरची गरज भासलीच तर खासगी वाहनाने जवळील रुग्णालय गाठावे लागते. दुसरा पर्याय नाही. आयरे गावात रिक्षास्थानक आहे. मात्र दुपारी व रात्री येथे रिक्षा उपलब्ध नसते. डोंबिवली स्थानकातून बालाजी गार्डनमध्ये येण्यासाठी रिक्षास्थानक नाही. शेअर रिक्षा मिळत नाही. स्वतंत्र रिक्षा केल्यास २५ ते ३० रुपये भाडे रिक्षाचालक आकारतात.
पाण्याची बोंब
येथील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न अतिशय जटिल असून रात्रीच्या वेळी केवळ एक तास तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. संकुलातील ज्या सहा सोसायटय़ांनाच ओ.सी. मिळाली आहे, त्यांनाच पाणीपुरवठा आहे. इतर इमारतींना याच सहा इमारतींतून पाणीपुरवठा होतो. आयरे गाव ते बालाजी गार्डन येण्यास रस्ता नाही. संकुलाच्या आराखडय़ामध्ये असलेल्या रस्त्याचे काम अद्याप रखडलेले आहे. या जागेत एक अनधिकृत चाळ येत असून तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असल्याने हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. खासदार, आमदार तसेच नगरसेवकांकडे याविषयीची तक्रार नागरिकांनी केली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप केवळ आश्वासनेच मिळाली. रस्ता काही मार्गी लागला नाही. सध्या तात्पुरत्या कच्च्या रस्त्याचा नागरिक वापर करत आहेत. या कच्च्या रस्त्यावर उडणारा धुरळा, खडी यामुळे नागरिकांना वाहन चालविणेही कठीण होते. परिणामी, वाहनांची चाके वारंवार पंक्चर होतात. त्यामुळे नागरिक पायी चालणेच पसंत करतात. पावसाळ्यात तर या मार्गावर चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे समस्या वाढतात. जवळपास शाळा नसल्याने मुलांना डोंबिवलीतील खासगी शाळांचा आधार घ्यावा लागत आहे. संकुलाच्या आराखडय़ामध्ये प्राथमिक शाळा दाखविण्यात आली आहे. मात्र तिचाही अद्याप पत्ता नाही. एवढे मोठे संकुल, पण येथे पार्किंगसाठी जागा नाही.
रहिवाशांचा संघर्ष सुरू
बालाजी गार्डन अ‍ॅडॉप कमिटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र शेरेकर यांनी सांगितले, २०१० मध्ये आम्ही कमिटी स्थापन केली. सुरुवातीला अनेक नागरी समस्या भेडसावत होत्या. अगदी प्राथमिक गरज असलेला पाणीपुरवठाही नव्हता. सांडपाणी उघडय़ावरूनच वाहत होते. संकुलाला कंपाऊंड नसल्याने वाळू-रेतीचे ट्रक सोसायटीच्या आवारातून जात होते. मात्र कमिटीने पाठपुरावा केल्याने गटार, पाणीपुरवठा, सोसायटीला संरक्षक भिंत आदी कामे मार्गी लागली आहेत. क्लब हाऊस सुरू केले. पाणीपुरवठा वाढविला. २००६ च्या करारान्वये सर्व सोयीसुविधा बिल्डरने रहिवाशांना दिल्या पाहिजेत. आम्ही घराचे सर्व पैसे दिले आहेत, तर अपुऱ्या सोयीसुविधा का? त्यासाठी आम्ही आजही लढा देत आहोत, मात्र रहिवाशांनीच का संघर्ष करायचा, येथे घर घेऊन आम्ही काही गुन्हा केला आहे का, असा सवालही त्यांनी या वेळी केला. कमिटीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे व पालिका प्रशासनाकडे या समस्यांविषयी पाठपुरावा केला आहे, मात्र त्यांना केवळ आश्वासनेच मिळत आहेत.

आहे पाच मिनिटांवर पण..
संकुलात प्रवेश करण्यासाठी मुख्य रस्ता नाही. डोंबिवली स्थानकापासून आधी आयरे गावात यावे लागते, तेथून मग संकुलात येता येते. कोपर स्थानकातून येथे येण्यासाठी रेल्वेच्या हद्दीतील रस्त्याचा वापर करावा लागतो. कोपर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी पूर्वेकडील रहिवाशांना सुरुवातीला रूळ ओलांडून जावे लागत असे. त्यानंतर पादचारी पूल बांधण्यात आला. आता स्थानक आहे, पूल आहे, रस्ता मात्र नाही. रेल्वेच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्थानक ते घर हा अवघा पाच मिनिटांचा प्रवास महिलांसाठी धोकादायक आहे. झोपडपट्टीतील मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढतात. टोमणे मारतात. त्यामुळे रात्री ९ नंतर येथील महिला शक्यतो प्रवास करणे टाळतात. गृहसंकुल तर अगदी चकाचक असले तरी येथे बाजारपेठ नाही. आजूबाजूला झोपडपट्टी असल्याने दर्जेदार सामान मिळणारी दुकाने येथे नाहीत. बाजारहाट करण्यासाठी संकुलातील रहिवाशांना डोंबिवली गाठावे लागते. कधी काळी आयत्या वेळी अगदी दूध जरी लागले तरी येथे मिळत नाही, अशी प्रतिक्रिया एका महिलेने व्यक्त केली. कारण येथील छोटे दुकानदार जास्त माल ठेवत नाहीत. भाजी आणि मासे आणायला बालाजीवासीयांना आयरे गावात जावे लागते.
शर्मिला वाळुंज

seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…
Jagdamba Industry factory in Khamgaon MIDC caught fire
खामगाव ‘एमआयडीसी’मधील जगदंबा उद्योगाला भीषण आग; लाखोंचे नुकसान
Kalyan, Road Works, Waldhuni Flyover, Traffic Jams, Commuters, public,
कल्याणमधील वालधुनी भागातील वाहन कोंडीने प्रवासी हैराण