X

‘बीएएमएस’ डॉक्टरांना कायम करणार?

पालिका रुग्णालयात एमबीबीएस तसेच एमडी डॉक्टर फार काळ सेवा देत नाहीत, असा अनुभव आहे.

कडोंमपा प्रशासनाच्या हालचाली सुरू

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात दोन ते तीन वर्षांपासून रुग्णसेवा देणाऱ्या ‘बीएएमएस’ डॉक्टरांना न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेऊन महापालिका प्रशासनाने कायम करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या डॉक्टरांना सेवेत कायम करावे यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणण्यात येत होता.

पालिका रुग्णालयात एमबीबीएस तसेच एमडी डॉक्टर फार काळ सेवा देत नाहीत, असा अनुभव आहे. त्यामुळे ही पदे वर्षांनुवर्षे रिक्त राहतात. रुग्णांच्या सेवेसाठी पुरेसे फिजिशिएन डॉक्टर नसल्याने उपचार देता येत नाहीत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी प्रशासनाने ‘बीएएमएस’ (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अ‍ॅन्ड सर्जरी) दहा डॉक्टरांना तात्पुरत्या तत्त्वावर भरती केले. या डॉक्टरांमध्ये पालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश जाधव यांची मुलगी, मंत्रालयातील निवृत्त सहसचिव आय. एम. मोरे (ईश्वर मोरे) यांची मुलगी, केडीएमसीतील डॉ. लीलाधर म्हस्के यांची भाची, शिवसेना शहरप्रमुख विजय साळवी यांची भाची असा नातेवाईकांचा गोतावळा होता. या डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करावे यासाठी प्रशासनावर दबाव होता. असे असताना बीएएमएस डॉक्टरांसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा आधार घेऊन प्रशासनाने या डॉक्टरांना सेवेत कायम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

बीएएमएस डॉक्टरांना कायम केले आणि त्यांच्याकडून रुग्णांना अ‍ॅलोपॅथीची औषधे देताना काही गडबड झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. पालिका रुग्णालयात आयुर्वेदिक डॉक्टर घेण्याची प्रथा सुरू झाली तर ती कायमची सुरू ठेवावी लागेल. यामुळे अ‍ॅलोपॅथी (एमबीबीएस, एम. डी.) डॉक्टरांना पालिकेत राखीव असलेल्या पदांवर पाणी सोडावे लागेल, अशी भीती पालिकेतील काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने कान, नाक, घसा, हाड, त्वचा, डोळे आदी विकारांचे तज्ज्ञ डॉक्टर पालिकेला मिळत नाहीत म्हणून त्या विशेष तज्ज्ञ पदांवर एमबीबीएस डॉक्टरांची भरती केली. विशेष तज्ज्ञांच्या पदांवर एमबीबीएस डॉक्टर भरण्यात आल्यामुळे पालिकेला अनेक वर्षे विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या भरतीवर पाणी सोडावे लागले.

भरती झालेले डॉक्टर फिजिशियन म्हणून सेवा देत आहेत. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा अडवून ठेवल्या. आता यामधील अनेक डॉक्टर निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत, अशी विश्वसनीय माहिती आहे. बीएएमएस डॉक्टर सेवेत कायम झाले की त्यांना पालिकेला सेवेतून काढता येणार नाही. त्यांना शासन मंजूर आहे ते वेतन द्यावे लागेल. म्हणजे जी रुग्णसेवा एमबीबीएस डॉक्टरांनी देणे अपेक्षित आहे; ती सेवा बीएएमएस डॉक्टर देतील. या पायंडय़ामुळे आयुर्वेद डॉक्टरांची भरती पालिकेत सुरू झाली की ती प्रथा खंडित करणे अवघड होणार आहे, अशी चिंता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. महापौर राजेंद्र देवळेकर सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील एका कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पालिका रुग्णालयातील बीएएमएस डॉक्टरांचा प्रस्ताव विचारविनिमयासाठी विधि विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्या विभागाचे मत आणि त्यानंतर हा प्रस्ताव महासभेपुढे पाठविण्यात येईल. या प्रस्तावावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

सामान्य प्रशासन विभाग, कडोंमपा

बुधवारीच बीएएमएस डॉक्टरांबाबत मत मागविण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. उचित निर्णयानंतर तो प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात येईल.

आनंद सूर्यवंशी, विधि अधिकारी

Outbrain