करोना प्रसाराच्या पाश्र्वभूमीवर शासकीय केंद्रांवर भार

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील बँका आणि टपाल कार्यालयात आधारकार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, अनेक बॅँका आणि टपाल कार्यालयात नागरिकांचे आधारकार्ड बनविले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शासकीय केंद्रावर मोठा भार पडत आहे. दुसरीकडे आधारकार्डसाठी मोठ मोठय़ा रांगा लागत असल्याने करोना प्रादुर्भावाची भीतीसुद्धा निर्माण झाली आहे.

शासकीय नियमाप्रमाणे नागरिकांना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.  आधारकार्ड काढणे आणि त्यात दुरुस्ती करणे यासाठी नागरिकांची सतत शोध सुरू असते, शासकीय केंद्रावर टोकन पद्धतीने आधार कार्ड काढावे लागत असल्याने या केंद्रांवर नंबर मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लागतात. यामुळे खाजगी दलालाकडून अतिरिक्त अधिक पैसे खर्च करून आधारकार्ड काढावे लागत आहेत.

सध्या वसई शहरात २ पोस्ट ऑफिस, १७ बँका आणि २ सेवा केंद्र आहेत. तर १७ शासकीय केंद्रे आहेत. सध्या या केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. दिवसाला केवळ ३० आधारकार्ड घेतले जातात. यामुळे पहाटेपासून मोठय़ा रांगा लागतात तर टपाल कार्यालय आणि बँकेत सुविधा उपलब्ध असूनही आधारकार्ड काढत नाहीत. यामुळे या केंद्रावर मोठा ताण आहे.

नियम व आदेशांना तिलांजली

नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांना महिन्याला किमान ५० नवीन आधारकार्ड आणि ५० बनलेल्या आधारकार्डमध्ये दुरुस्ती करणे बंधनकारक केले आहे. पण या बँका आणि टपाल कार्यालयामध्ये नियम धाब्यावर बसविले जातात. या सुविधेची नागरिकांना कोणतीही माहिती देत नाहीत. यामुळे या ठिकाणी आधारकार्ड बनविले जात नाहीत.

बँक आणि टपाल कार्यालयाला आधारकार्ड बनविणे बंधनकारक आहे. जे बनवत नसतील त्यांना या बद्दल सूचना दिल्या जातील तसेच पाहणी केली जाईल.

– प्रवीण कासारे, समन्वयक, पालघर