03 March 2021

News Flash

बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेली टोळी जेरबंद

या टोळीतील अनेक जण मजुरी, फळविक्रेते, शेती करणारे आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

घोडबंदर येथील कासारवडवली भागात शनिवारी पहाटे एका बँकेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या आठ जणांच्या आंतरराज्य टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. हे सर्व आरोपी झारखंड राज्याचे रहिवाशी असून त्यांनी यापूर्वी ठाणे तसेच आसपासच्या शहरात दरोडय़ाचे गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच या टोळीला येथे राहण्यासाठी आसरा देणाऱ्या इतर दोघांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून गावठी कट्टा, ड्रिल मशीन, पान्हे, पकड, गॅस कटिंग पाइप, रेग्युलेटर,  ड्रायव्हर आणि पाच किलो वजनाचा एक गॅस सिलेंडर, रबरी पाइप पोलिसांनी जप्त केले आहेत.

साकिम सौदागर अली शेख (३३), शहजहान अली ऊर्फ काळू रुस्तम शेख (४७), मोहंमद मनारुल रुहुल शेख (२१), शाहजहान फजलु शेख (३५), मकसुद जुम्मन शेख (२४), रेजाऊल अकबर शेख (३१), शैफुद्दीन रेजाबअली शेख (३८), जुगनू खालेक शेख (२५) अशी अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींची नावे आहेत. यातील साकिम हा या टोळीचा म्होरक्या आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्यासाठी एक टोळी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याआधारे पथकाने सापळा रचला.

त्या वेळेस बँकेला लागून असलेल्या राज मोटार ड्रायव्हिंग स्कूल या दुकानातून भिंत फोडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे पथकाने दुकानाचे शटर उघडले असता साकीमसह त्याचे साथीदार दरोडा टाकण्यासाठी बँक आणि दुकानाच्या मध्ये असलेली भिंत फोडत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या चौघांना पथकाने ताब्यात घेतले.

या टोळीतील अनेक जण मजुरी, फळविक्रेते, शेती करणारे आहेत. चोरी करण्यापूर्वी परिसरात फळ विक्री करून आरोपी रेकी करत असे. त्यानंतर बँकेच्या किंवा सराफाच्या दुकानाच्या बाजूचे दुकान फळ विक्रीसाठी भाडय़ाने घ्यायचे आणि दुकानाच्या आतील भिंत तोडून बँकेत किंवा सराफाच्या दुकानात दरोडा टाकून पुन्हा झारखंडला पसार व्हायचे, अशी या टोळीची कार्यपद्धती आहे. यापूर्वीही अशा प्रकारे दरोडा टाकणाऱ्या झारखंडच्या दोन टोळ्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा या दोन्ही टोळ्यांशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे, असेही रानडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:34 am

Web Title: bank robbery gang arrested in thane
Next Stories
1 परिवहन अधिकाऱ्याचा तरुणीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
2 शिक्षक पात्रता परीक्षेत उशिरा येणाऱ्या परीक्षार्थींनी घातला गोंधळ
3 ठाण्यात बँका लुटणाऱ्या टोळीला म्होरक्यासह अटक
Just Now!
X