एक एप्रिलपासून मद्यविक्रीस मनाई

राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या ५०० मीटरच्या आत मद्यविक्री करण्यास बंदी असल्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास पालघरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरुवात केली आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्य़ातील तब्बल १५६ बारमालकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहे. १ एप्रिलपासून महामार्गावर मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आल्याने बारमालकांचे धाबे दणाणले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गालगत ५०० मीटरच्या आत मद्यविक्री करता येणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून महामार्गालगतच्या बार आणि मद्यविक्री करणाऱ्या हॉटेलना आपल्या परवान्याचे नूतनीकरण करता येणार नाही. तशा आशयाच्या नोटिसा पालघरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व हॉटेलना पाठवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत १५६ हॉटेलचालकांना या नोटिसा पाठवण्यात आल्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागाने सांगितले आहे. यात बार, वाइन शॉप, देशी मद्यविक्रीची दुकाने यांचा समावेश आहे. राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. एम. लेंगरे यांनी या नोटिसा बजावल्या आहेत.

याला महामार्ग म्हणतात?’

विरार येथे नारिंगी फाटय़ापासून पश्चिमेला सत्पाळा, आगाशीपर्यंतचा मार्ग हा राज्य महामार्गाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे तेथील सर्व बारमालकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते हवालदिल झाले आहे. हा अंतर्गत रस्ता आहे आणि त्याला महामार्ग म्हणतात हे आज आम्हाला कळले, असे एका हॉटेल मालकाने सांगितले. याबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेच्या सुनावणीवर आमचे लक्ष लागले असून तेथे आम्हाला न्याय मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.