डिसेंबरअखेरीस कार्यान्वित होणार; मात्र प्रक्रिया केलेल्या पाण्याचे एकत्रिकरण आणि जलवाहिन्यांची कामे रेंगाळली

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणारे केंद्र डिसेंबरच्या अखेरीस कार्यान्वित होणार आहे. मात्र अनेक कामे रेंगाळली असल्याने अनेक अडचणी आणि अडथळे या केंद्राभोवती आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचे एकत्रीकरण करणे आणि पाण्याचा केंद्राकडे आणण्याच्या आणि समुद्राकडे नेण्याच्या जलवाहिनीचे काम रेंगाळल्याने अडचणींची मालिका सुरूच आहे.

तारापूरमध्ये प्रथम दोन एमएलडी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सीईटीपी) उभारणी १९९२ मध्ये झाली. २००६ मध्ये २५ एमएलडी क्षमतेचा सीईपीटी प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू झाला. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचा विस्तार झाल्याने ४० ते ४५ एमएलडी सांडपाणी निर्मित होऊ  लागल्याने सीईटीपीच्या विस्ताराची गरज भासू लागली. २०१२ पासून नव्याने ५० एमएलडी क्षमतेच्या सीईपीटीच्या जागेचा शोध सुरू झाला. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरू होण्यात अनेक अडचणींचे टप्पे दूर करून एप्रिल २०१४ उजाडले.

१२.५ एमएलडीचे चार प्रक्रिया युनिटच्या उभारणीसोबत २५ एलएलडीच्या दोन प्रक्रिया टाकींच्या प्रकल्पाला आधी ७९.५ कोटी रुपयांचा खर्च अंदाजित होता. या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) निरी या संस्थेकडे मान्यतेसाठी पाठविल्यानंतर त्यांनी मुंबई आयआयटी या संस्थेचा अभिप्राय घेण्याचे निर्देश दिले. या सर्व तांत्रिक मान्यतेच्या प्रक्रियेत २७ महिन्यांचा अवधी लागला. त्याबरोबर मे २०१७ मध्ये या प्रकल्पाचा डीपीआर मंजूर करताना आयआयटीने दोन वेगळ्या प्रक्रियांचा अंतर्भाव करण्याचे सूचित केल्याने या प्रकल्पाची किंमत ११९ कोटी रुपयांच्या पुढे गेली.

या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून १७ कोटी रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याने प्रकल्प पूर्ण होण्याच्या कामाला गती मिळाली. मात्र तरीही अनेक कामे रखडली आहेत. या प्रकल्पासाठी ४००० अश्वशक्ती विद्युत जोडणीची महापारेषणकडून मान्यता मिळाली. मात्र उच्च दाबाची स्वतंत्र केबल टाकण्याचे काम रखडले आहे. त्याशिवाय पाण्याचा केंद्राकडे आणण्याच्या आणि समुद्राकडे नेण्याच्या जलवाहिनीचे काम रेंगाळले आहे.

प्रलंबित कामे

* प्रकल्पातील पाइपलाइन, विद्युत वाहिनी टाकण्याचे आणि जोडण्याचे काम

*  प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा साठा करण्यासाठी १० हजार चौरस मीटर क्षेत्रात सॅम्पची उभारणी.

*  औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी नव्या प्रकल्पाच्या ठिकाणी वळवण्याची

योजना

*  प्रक्रिया केलेले सांडपाणी समुद्रकिनाऱ्यापासून ७.२ किलोमीटर अंतराच्या खोलीपर्यंत नेण्याची जलवाहिनी व्यवस्था.

या प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून १७ कोटी रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याने प्रकल्प पूर्ण होणाऱ्या कामांना गती मिळाली आहे. एमआयडीसीच्या पाहणीनुसार प्रकल्प ७० टक्के पूर्ण झाला असून या प्रकल्पातील २५ एमएलडीचा पहिला टप्पा वर्षांअखेरीस पूर्ण होईल.

– डी. के. राऊत, प्रकल्प समन्वयक