महापालिका आयुक्तांचे आदेश; ‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्ताची दखल

ठाणे शहरातील उद्यानांच्या दुर्दशेचे दशावतार ‘लोकसत्ता ठाणे’ने छायाचित्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध करताच त्याची दखल महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतली आहे. या उद्यानांच्या सुशोभीकरणाचे नव्याने आराखडे तयार करण्याचे आदेश संबंधीत विभागाला दिले आहेत. महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावालगत असलेल्या आजी-आजोबा उद्यानात पडलेला बांधकामाचा कचराही तातडीने हटविण्याचे आदेश त्यांनी दिले, तसेच या उद्यानाचे नूतनीकरण करून रहिवाशांसाठी ते लवकरात लवकर खुले करुन दिले जाईल, अशी माहिती जयस्वाल यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.

तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील बहुतांश तलावांची दुर्दशा झाली असून त्यापाठोपाठ उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीकडेही संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. मोठय़ा प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणांमुळे ठाणे शहरात मोकळ्या जागांचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे विविध तलावांच्या किनारी पाय मोकळे करण्यासाठी तसेच व्यायामासाठी येणाऱ्या ठाणेकरांचा आकडा मोठा आहे. मूळ शहरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या कमी प्रमाणात उद्याने आहेत. मात्र, यापैकी बऱ्याच उद्यानांची अवस्था दयनीय झाली आहे. घोडबंदर तसेच शहरातील इतर भागांमध्ये मोठय़ा बिल्डरांच्या विकास प्रकल्पांमध्ये अडसर ठरत असलेली झाडे कापण्यास परवानगी देण्यात वृक्ष प्राधिकरण मग्न असल्याचे चित्र असून त्यामुळे उजाड होत चाललेल्या या उद्यानांकडे कुणी लक्ष पुरवायचे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाची धडाकेबाज मोहीम राबविणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांचेही या लहान उद्यानांच्या दुरवस्थेकडे फारसे लक्ष नाही. त्यामुळेच महामार्गालगत असलेल्या हरितपथाचे वाळवंट होऊनही त्याकडे उद्यान विभागाचे अधिकारी ढुंकूनही पहात नसल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य ठाणेकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या या विषयाकडे उद्यान विभाग तसेच महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने एकंदरीत नाराजीचा सूर आहे.

‘तातडीने सुशोभीकरण करणार’

ठाण्यातील उद्यानांच्या दुरवस्थेबाबतची सचित्र माहिती ‘ठाणे लोकसत्ता’ने मंगळवारी ‘इन फोकस’च्या माध्यमातून मांडली होती. ठाणे रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावदेवी मैदानाच्या बाजुला असेलेले शिरीष कुमाल बालोद्यान, मखमली तलावजवळील उद्यान तसेच महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आजी-आजोबा उद्यानाची देखभालीअभावी कशी दुर्दशा झाली आहे याचे चित्रण या मालिकेतून करण्यात आले होते. मुख्यालयालगत असलेल्या कचराळी तलावालगत असलेल्या उद्यानाची देखभाल ठेवण्यातही उद्यान विभागास अपयश येत असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत होता. अखेर या छायाचित्रांची दखल आयुक्त जयस्वाल यांनी घेतली असून पुढील काही दिवसात सर्व उद्यानांचे सुशोभीकरण हाती घेतले जाईल, अशी ग्वाही त्यांनी ‘ठाणे लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.