सायप्रेस उद्यान, मुलुंड
‘प्रभातकाळी चालत जावे..’ असं म्हटलं जातं. सकाळची शुद्ध हवा, वातावरणातील गारवा, पाखरांची किलबिल अशी एकूणच निसर्गाची गजबज चित्तवृत्ती प्रसन्न करतेच; पण त्यासोबत रात्रीच्या निद्रेने आळसावलेल्या शरीरालाही स्फूर्ती देते. त्यामुळेच हल्लीच्या ‘ट्रेडमिल’च्या जमान्यात लोक ‘मॉर्निग वॉक’ किंवा ‘जॉगिंग’साठी बाहेर पडतात. विशेषत: दिवसभर प्रदूषित हवेने त्रासलेले शहरवासीय मोकळ्या हवेच्या आणि भरमसाट प्राणवायूच्या शोधात सकाळी जवळपासची उद्याने किंवा नैसर्गिक संपदेने व्यापलेली ठिकाणे गाठतात. त्याच पद्धतीने संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठीही अशा ठिकाणांकडे नागरिक धाव घेतात. विकासाच्या झपाटय़ात अशी ठिकाणे शोधणे हीदेखील एक पायपीटच असते. त्यामुळेच ठाणे आणि परिसरातील निसर्गरम्य ठिकाणांचा वेध घेणारे हे पाक्षिक सदर..

डोंगराच्या पायथ्याशी स्वच्छ, सुंदर आणि मोकळे उद्यान.. उद्यानामध्ये खुली व्यायामशाळा.. स्केटिंग रिंग, हॉलिबॉल मैदान, कारंजे, शोभिवंत झाडे, हिरवळ आणि चालण्यासाठी ट्रॅक.. उद्यानाच्या बाजुला उंच चढण आणि घनदाट झाडांची साथ.. व्यायामाचे असे ठिकाण प्रत्येकालाच हवे हवेसे वाटेल. परंतु उपनगरातील शहरीकरण पाहिल्यानंतर असे ठिकाण मिळणे आणि त्या ठिकाणी दररोज व्यायामासाठी जाणे म्हणजे नागरिकांसाठी एक दिवास्वप्नच असते. या सगळ्या सेवा आणि सुविधा एकाच ठिकाणी शोधणाऱ्यांची स्वप्नपूर्ती करणारे ठाणे-मुलुंड सीमेवरचे ठिकाण म्हणजे ‘सायप्रेस’ अर्थात ‘सरदार प्रतापसिंह मनोरंजन मैदान’ हे आहे. ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुलुंड शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे हे मैदान आहे. या मैदानाचे वर्णन करताना ‘सकाळच्या व्यायामाचे सुयोग्य ठिकाण’ असे म्हणणे योग्य ठरेल. ठाण्याच्या श्रीनगर परिसरातील वैशाली नगर भागातून मुलूंडमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हे मैदान असून सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे मैदान नागरिकांसाठी खुले होते. स्वच्छ वातावरण, झाडांची दाटी, हिरवळीचे गालिचे आणि व्यायामासाठीची साधने यामुळे हे ठिकाण व्यायाम करणाऱ्यांना आकर्षित करते. त्यामुळे मुलुंड आणि ठाण्यातील अनेक नागरिक या मैदानावर भल्या पहाटे व्यायामासाठी पोहोचतात.
योग, व्यायाम, खेळ आणि चालणे..
आरोग्याविषयीच्या जागृकतेने योग, व्यायाम आणि चालण्याकडे वळणाऱ्या नागरिकांसाठी या मनोरंजन मैदानामध्ये सगळ्या सुविधा प्राप्त होत असून कोणत्याही अडथळ्याशिवाय या ठिकाणी व्यायाम करता येतो. येथे योग करणाऱ्यांसाठी मोकळे व्यासपीठ असून ज्येष्ठ नागरिकांचा गट, तरुण मंडळी या कट्टय़ावर बसून ‘अनुलोम, विलोम’ करताना दिसून येतात. याशिवाय वेगवेगळी आसने घालणाऱ्या मंडळींचा राबताही या व्यासपीठावर असतो. योग करण्यासाठी छोटय़ा चटया घेऊन हिरवळीवर बसून योगासने करत असल्याचे चित्रही येथे दिसते. याशिवाय व्यायाम करण्यासाठी दोन व्यवस्था या मैदानाच्या आसपास आहेत. त्यामध्ये खुली व्यायामशाळा ही सर्वत्र प्रचलित होणारी नवी संकल्पना इथे पाहायला मिळते. मोकळ्यावर असलेल्या व्यायाम साहित्यावर अधूनमधून चालणारी मंडळी आपला घाम गाळून मगच घरी परततात. तर मैदानाच्या बाजूला एक बंदिस्त व्यायामशाळा असून त्या ठिकाणी परिसरातील तरुण मंडळी व्यायामाचा आनंद घेतात. या ठिकाणच्या विस्तृत जॉगिंग ट्रॅकचा पुरेपूर वापर करणारी चालणारी आणि धावणारी मंडळी घेतात. खेळणाऱ्यांसाठी बंदिस्त मैदान असून त्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळता येतात. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला छोटय़ा छताखाली बसण्यासाठी बेंचेस ठेवण्यात आले आहेत. दहा वर्षांखालील मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळा, सीसॉ सारखी खेळणीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय या मैदानाची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार, सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संध्याकाळी या मैदानामध्ये रंगीतसंगीत कारंज्याची मजा घेता येत असून त्याची मजा पाहण्यासाठी ठाण्यातील तरुण बहुसंख्येने या उद्यानात दाखल होत असतात.
स्केटिंग रिंग..
सर्वासाठी सर्व काही याप्रमाणे आबालवृद्धांना हव्या त्या सगळ्या गोष्टी ‘सरदार प्रतापसिंह मनोरंजन मैदाना’त मिळतात. या मैदानामध्ये स्केटिंग रिंग असून त्यावर वेगवेगळ्या वयोगटांतील मुलांना स्केटिंगचे प्रशिक्षण दिले जाते. अर्पित गुप्ता हे प्रशिक्षक विद्यार्थ्यांना स्केटिंगचे ज्ञान देत असून या रिंगमध्ये वेगवेगळ्या वयोगटांतील मुले स्केटिंगचा आनंद लुटताना दिसतात. त्यामध्ये तीन वर्षांच्या हर्षपासून आठ वर्षांच्या लिआन डिसुझासारख्या अनेक मुलांचा सहभाग आहे.
रसवाले काका..
व्यायामाचे ठिकाण म्हटले की आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या रसांची विक्री करणाऱ्यांची रेलचेलही परिसरात पाहायला मिळते. या मनोरंजन पार्कच्या प्रवेशद्वारावरही असे आरोग्यवर्धक रस चाखण्याची संधी मारुती साळवी हे रसवाले करतात. आवळा, कारले, लिंबू, दुधी, बिट, तुळसी, आले यांसारख्या पदार्थाचे १२ प्रकारचे रस इथे चाखण्यास मिळतात.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा शेजार..
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या या उद्यानातून येथील जंगलामध्येसुद्धा प्रवेश करता येत असून वन कायद्यांचे उल्लंघन न करता या भागात चालण्यासाठी जाता येते. दाट जंगल, चढणाचा रस्ता आणि खुले वातावरण यामुळे या भागात चालण्याचा व्यायाम चांगला होत असून अनेक ट्रेकर्स मंडळी रोजचा चढण्याचा व्यायाम करण्यासाठी इथे दाखल होतात. या जंगलात लोकनिसर्ग, सनराइज पॉइंट, थ्री-टॉप, तारामती मंदिर आणि तुलसी लेक ही ठिकाणे आहेत.

जंगल स्वच्छ करणारे जय भोले ट्रेकर्स
आपण ज्या ठिकाणी चालण्यासाठी येतो त्या भागात होत असलेला कचरा पाहून मन विषण्ण होते. अनधिकृतपणे जंगलात घुसणारी अतिउत्साही मंडळी या भागात कचरा करत असून त्यामुळे येथील वनक्षेत्रात कचरा पसरत होता. हा कचरा उचलण्यासाठी ‘जय भोले ट्रेकर्स’च्या मंडळींनी दर गुरुवारी कचरा उचलण्याची मोहीम सुरू केली. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ ही मोहीम सुरू असून प्लास्टिक, बिअरच्या बाटल्या, काचा, कागदी प्लेट यांसारखा कचरा ही मंडळी जंगलातून उचलून बाहेर काढतात. महापालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडे हा कचरा सोपवला जातो. अजय शहा, रमेश हाजवानी, सुनील वनगे, डॉ. सुरेश वानखेडे, डॉ. नीलेश पाटील, नीलिमा पाटील, हरिश सोहनी, राजू बागिया, रायसिंग जेठवानी, अल्पेश भानुशाली अशी मंडळी यामध्ये सहभागी होत असतात.

अनुभवाचे बोल..
शहराच्या सान्निध्यात मोकळी हवा
शहराच्या आणि जंगलाच्या सान्निध्यात असलेला हा परिसर सगळ्यांसाठीच आनंदाची पर्वणीच असून इथे व्यायाम करण्यासाठी अनेक मंडळी येतात. प्रत्येकाला ह000वे ते इथे मिळत असल्याने यासाठी आम्ही समाधानी आहोत. या परिसरातील खुल्या व्यायामशाळेचे साहित्य वाढवावे, तसेच त्यांची योग्य देखभाल दुरुस्ती राखून हे साहित्य कायमस्वरूपी वापरात योग्य ठेवावे.
वैशाली सिंग

निसर्गाचे दर्शन घडवणारे ठिकाण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निकट असलेल्या या भागात गेल्या २० वर्षांपासून येत असून वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी आणि निसर्गातील निरनिराळ्या वनस्पतींचे दर्शन इथे घडते. त्यामुळे नेहमीच इथे यायला आवडते. शिवाय इथे स्वच्छता मोहीम राबवून मनाला समाधान मिळते.
सुनील वनगे, जय भोले ट्रेकर्स

मोठे रिंग उपलब्ध व्हावे

स्केटिंगसाठी मैदानातील रिंग उपलब्ध असून त्याचा वापर सरावासाठी केला जातो. याशिवाय या भागात काही सोसायटय़ांमध्ये मोठे स्केटिंग रिंग आहेत. त्याप्रमाणेच भव्य रिंग या भागात उपलब्ध व्हावे. ज्यामुळे मुलांना आणखी उत्साहाने सराव करता येईल.
– अर्पित गुप्ता

आनंद देणारे ठिकाण
या परिसरामध्ये येऊन स्केटिंग करताना खूप आनंद मिळत असून त्यामुळे इथे रोज सराव करण्यासाठी येत राहावे असे वाटते. चांगले उपक्रम इथे होत असल्याने त्याचा फायदा होत असतो. शिवाय मुलांना स्केटिंग शिकवत असताना पालकसुद्धा परिसरातील साहित्यावर व्यायाम करत असल्याने कुटुंबाला त्याचा फायदा होतो.
– लिआन डिसुझा