कल्याण-डोंबिवलीत भूमाफियांचा उच्छाद ल्ल बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत बेकायदा बांधकामांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असतानाच, निवडणुकीच्या धावपळीचा गैरफायदा घेत भूमाफियांनी बेकायदा बांधकामांचा सपाटा लावला आहे. आयरे, भोपर भागांतील खाडी परिसरातील खारफुटींची बेसुमार कत्तल करून त्या ठिकाणी रातोरात बेकायदा चाळी उभारण्यात येत आहे. अनेक ठिकाणी माफियांनी पत्रे उभारून या जागा अडवण्याचा प्रयत्नही केला आहे.
शहरात नवीन बांधकामांना परवानगी देण्यास उच्च न्यायालयाची बंदी असताना कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांत बेसुमार बेकायदा चाळी, इमारतींची बांधकामे उभी करण्यात येत आहेत. या बांधकामांचा मुद्दा निवडणुकीत मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील खाडी परिसरात रातोरात चाळी उभ्या केल्या जात आहेत. आयरे, भोपर गावाच्या परिसरातील खाडीपट्टय़ातील खारफुटी तसेच तिवरांवर घातक औषधांचा मारा करून ती मारली जात आहेत. नंतर जेसीबीच्या साह्य़ाने या खारफुटी हटवून तसेच तेथे भराव टाकून त्यावर चाळी उभारण्यात आल्या आहेत.
आयरे, भोपर हा भाग पालिकेच्या ‘ग’ प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. या विभागातील काही कर्मचाऱ्यांना या बांधकामांची पूर्ण माहिती असूनही, ते याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. पर्यावरणप्रेमींच्या एका गटाने आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्याचे ठरवले आहे.

या बेकायदा चाळींबाबत तक्रारी येत आहेत. मात्र मी साहाय्यक निवडणूक अधिकारी असल्यामुळे निवडणूक कामांतच व्यस्त आहे. मात्र, मोठय़ा प्रमाणात खारफुटी तोड सुरू असेल तर तातडीने कारवाई करण्यात येईल.
– मधुकर शिंदे, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी, कडोंमपा