भरधाव वाहनांना ‘ब्रेक’, मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्रास
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक २२ वर भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांना लगाम घालण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, हे गतिरोधक भरधाव वाहनांऐवजी सर्वसामान्य नागरिकांना आता डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. अपघात रोखण्यासाठी अचानकपणे बसविण्यात आलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे किंवा त्या भागात गतिरोधक असल्याच्या सूचना देणारे फलकही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या भागात सात ते आठ दुचाकींचे किरकोळ अपघात घडल्याने हे गतिरोधक अपघातांना निमंत्रण देणारे ठरत असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक २२ हा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. वागळे इस्टेट परिवहन आगारातून सुटणाऱ्या बहुतेक बसगाडय़ा याच मार्गे जातात. तसेच ठाणे स्थानक आणि मुंबई परिसरात जाणारी वाहनेही या मार्गाचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. याशिवाय, या मार्गालगतच नवीन पारपत्र कार्यालय असल्याने तिथे येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. परंतु या मार्गावर फारसे गतिरोधक नसल्याने चालक वेगाने वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रसंग सातत्याने ओढावतात. तसेच रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी हा प्रवास धोक्याचा ठरत होता. या पाश्र्वभूमीवर वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी महापालिकेने या मार्गावर गतिरोधक बसविले. त्यामुळे अपघातांना आळा बसेल अशी आशा व्यक्त होत असतानाच ती फोल ठरू लागली आहे.
अपघातात वृद्ध जखमी
इंदिरानगर भागात राहणारे मारुती कदम हे नेहमी रस्ता क्रमांक १६ वरून प्रवास करतात. शनिवारी सायंकाळी ते आणि त्यांचे काका धोंडू नारकर हे दुचाकीने स्टेट बँकेच्या एटीएममध्ये जात होते. दरम्यान, या मार्गावर गतिरोधक बसविण्यात आले होते. मात्र, ते नेहमीप्रमाणेच दुचाकी चालवीत होते. या गतिरोधकाविषयी ते अनभिज्ञ होते. त्यामुळे अचानक आलेल्या गतिरोधकामुळे तोल जाऊन त्यांचा अपघात झाला. यामध्ये धोंडू नारकर यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
अशास्त्रीय गतिरोधकांच्या तक्रारी..
ठाणे महापालिकेने वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक २२ वर गतिरोधक बसविले आहेत. मात्र या संबंधी कोणत्याही सूचना देणारे फलक लावलेले नाहीत. तसेच गतिरोधकावर पांढरे पट्टेही मारण्यात आलेले नाहीत. यामुळे अनभिज्ञ असलेल्या चालकांची फसगत होत असून अपघात होत आहेत. विशेषत: दुचाकीचे अपघात घडत आहेत. बहुतेक गतिरोधक शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आलेले नाहीत. यामुळेही अपघात होत आहेत, असे तेथील वाहनचालकांचे म्हणणे आहे. गतिरोधक वाहतूक नियंत्रक विभागाच्या मार्गदर्शन व प्रचलित नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने बसविण्याचे आदेश महापौर संजय मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी प्रशासनाला दिले होते. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे उघड होत असून त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.