ठाण्यात करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचा परिणाम

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होऊ लागली आहे. त्याचबरोबर शहरातील ९३ टक्के करोनाबाधित आतापर्यंत बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील महापालिका तसेच खासगी रुग्णालयातील ९३ टक्क्यांच्या आसपास म्हणजेच एकूण ४३३४ खाटांपैकी ३३८९ खाटा रिकाम्या आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून करोनाची लागण होत असलेल्या रुग्णांपैकी गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाणही कमी दिसून येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४५ हजार ५४१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केवळ २२९७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित ४२ हजार १११ (९३ टक्के) रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच १ हजार १३३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. रुग्णांच्या तुलनेत शहरातील खासगी कोविड रुग्णालये अपुरी पडू लागली होती. खासगी रुग्णालये जास्त दराने बिले आकारत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. या तक्रारींची पालिकेकडून दखल घेण्यात आली होती. या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी खाटा मिळविण्यासाठी रुग्णांना एक ते दोन दिवस थांबावे लागत होते. त्यावरून महापालिका प्रशासनावर टीका होऊ लागली होती. त्यानंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेने शहरात एक हजार खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले होते. याशिवाय रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन म्हाडाच्या माध्यमातून कळवा आणि मुंब्रा परिसरातही कोविड रुग्णालये उभारण्यात आली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळून त्यांना उपचार मिळणे शक्य झाले होते. ही सर्वच रुग्णालये रुग्णांनी भरली होती. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने रुग्णालयातील खाटा रिकाम्या असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे शहरात महापालिका आणि खासगी अशी ३२ कोविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत ४ हजार ४३४ खाटा असून तिथे सध्या १ हजार ४५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित १ हजार २५२ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालयात सद्य:स्थितीत ९३ टक्के खाटा शिल्लक आहेत. यामध्ये प्राणवायू नसलेल्या १ हजार ५२७ खाटा तर, प्राणवायूयुक्त १ हजार ६४७, अतिदक्षता विभागातील २१५ आणि व्हेंटिलेटरच्या १०४ खाटा शिल्लक आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून यामुळे शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्याचबरोबर करोना रुग्णांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना योग्य उपचार दिले जात आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शहरातील कोविड रुग्णालयातील खाटा ९३ टक्के रिकाम्या असल्याचे दिसून येत आहे.

– डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका