बीअर विक्रीच्या दुकानांमध्ये बीअर पिण्याची सोय; सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली बीअर विक्रीची अनेक दुकाने ही केवळ दुकानेच राहिली नसून त्याचे रूपांतर छोटेखानी बीअर बारमध्ये झाले असल्याचे दिसून येत आहे. या दुकानातच बेकायदा बीअर पिण्याची व्यवस्था दुकानमालकांनी केली असून याकडे संबंधित सरकारी यंत्रणांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

केवळ बीअर विक्री दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये ठिकठिकाणी बीअर विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. सध्या शहरात एकंदर ५५ बीअर विक्रीची दुकाने सुरू आहेत. या दुकानांमधून केवळ बीअर विक्रीलाच परवानगी आहे, परंतु अनेक दुकानांमधून दुकानातच बीअर पिण्याचीही व्यवस्था दुकानमालकांनी केली आहे. सध्या कडक उन्हाळा असल्याने बीअरला मद्यप्रेमींकडून जोरदार मागणी आहे. याचा फायदा बीअर विक्री करणाऱ्यांनी घेतला आहे.

काही दुकानदारांनी आपल्या दुकानाचा पुढचा भाग बंदिस्त करून त्यात ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या आतल्या बाजूलाच ही सर्व व्यवस्था केली आहे, तर काहींनी चक्क दुकानाच्या बाजूलाच आणखी एक व्यावसायिक गाळा घेतला असून त्यात बीअर बार सुरू केला आहे. ग्राहकांना बीअरसोबत खायचे पदार्थही लागत असल्याने ती सुविधाही दुकानदारांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

बीअरच्या दुकानांना लागूनच शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले असून या स्टॉलवरून हे पदार्थ ग्राहकांना पुरवले जातात.

त्यामुळे दुकानदारांचा बीअरचा खपही वाढत आहे आणि ग्राहकांचीही आयतीच सोय होत आहे. हे सर्व काम बेकायदा सुरू असतानाही बीअर विक्री दुकानांना परवानगी देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. दुकानात केवळ बीअरची विक्रीच केली जात आहे याकडे या विभागाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

विमा कर्मचाऱ्यांना त्रास

मीरा रोड येथे एका बीअर विक्री करणाऱ्या दुकानालगतच विमा कंपनीचे कार्यालय आहे. संध्याकाळच्या वेळी बीअर पिणाऱ्यांचा अड्डा जमा होत असल्याने कार्यालयाबाहेर बाटल्यांचा खच तसेच उरलेले खाद्यपदार्थ पडलेले आढळून येतात. याविरोधात विमा कार्यालयाने पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे, परंतु कारवाई झाली नाही.