19 February 2019

News Flash

घोलवडच्या चिकूचा गोडवा नव्या उत्पादनांत

आरोग्यासाठी गुणकारक असण्याबरोबरच चवीतही गोड असल्यामुळे घोलवडचे चिकू अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

नितीन बोंबार्डे

चिकूच्या भुकटीपासून बीयरनिर्मितीची जोड

नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्षे ही जशी जगप्रसिद्ध झाली, तशीच लोकप्रियता घोलवडच्या चिकूंनाही मिळाली. भौगोलिक नामकरण (जीआय) मिळाल्यापासून सातासमुद्रापार स्वतंत्र ब्रॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोलवडच्या चिकूने आता नवनवीन अवतारांत खवय्यांना तृप्त करण्यास सुरुवात केली आहे. चिकू फळांना अपेक्षित बाजारभाव मिळेनासा झाल्यानंतर आता फळउत्पादकांनी चिकूची भुकटी, बीयर, चिप्स, वडय़ा, आईस्क्रीम, सरबत अशा पूरक उत्पादनांच्या माध्यमातून अर्थाजनाच्या नवीन संधी शोधल्या आहेत.

चिकू हे बाराही महिने उपलब्ध होणारे सेंद्रिय पीक आहे. आरोग्यासाठी गुणकारक असण्याबरोबरच चवीतही गोड असल्यामुळे घोलवडचे चिकू अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. मात्र चिकू उत्पादकांना या फळाच्या विक्रीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. प्रतवारीत अव्वल दर्जाच्या चिकूला चांगला दर मिळत असला तरी दुय्यम आणि तिसऱ्या दर्जाच्या चिकूचे दर खूपच कमी असतात.

अनेकदा तिसऱ्या दर्जाच्या चिकूच्या विक्रीतून उत्पादकांना नुकसान सोसावे लागते. या पाश्र्वभूमीवर येथील अनेक बागायतदारांनी गेल्या काही वर्षांपासून चिकूच्या फळावर प्रक्रिया करून वेगवेगळी उत्पादने बनवून त्यांची विक्री सुरू केली आहे.

बाराही महिने उत्पादन देणाऱ्या चिकूपासून भुकटी, चिप्स, कुरडय़ा, वेफर्स, भाकरी, लोणचे, मुरांबा, मिठाई, चॉकलेट, आईस्क्रीम, सरबत, वाइन, बीयर अशी उत्पादने बनवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, चिकूच्या फळावर जास्त रासायनिक प्रक्रिया करावी लागत नाही. सोलर ड्रायरमध्ये सुकवलेल्या फळाची भुकटी करून इतर उत्पादने बनवली जातात. त्यामुळे या पदार्थापासून आरोग्याला धोका नाही, असे उत्पादक आणि प्रक्रिया करणारे कारखानदार यांचे म्हणणे आहे.

आंबा, द्राक्ष याप्रमाणे चिकूपासून होणाऱ्या उत्पादनांची प्रसिद्धी झाल्यास ग्राहक त्याकडे अधिकाधिक आकर्षित होतील व या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळेल.

– यज्ञेश सावे, चिकू बागायतदार, बोर्डी

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट व्हावे, यासाठी शासनाने ‘डबलिंग फार्मिग सेंटर’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे येथे उभारला आहे. त्याच धर्तीवर चिकू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीही साहाय्य करावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत.

– विनायक बारी, अध्यक्ष, राष्ट्रीय चिकू उत्पादक संघ, बोर्डी

प्रक्रियेची गरज

* चिकू झाडावरून काढल्यानंतर तो माल लिलाव केंद्रात आणला जातो. त्याची प्रतवारी करून दर निश्चित केला जातो.

* गोटिबंध, मोठा आकार, डाग नसलेला, कीड नसलेला चिकू अव्वल प्रतीचा समजला जातो. त्याचा शेकडानुसार दर ठरवला जातो.

* त्याचप्रमाणे दुय्यम आणि तिसऱ्या दर्जाचा चिकूही वेगळा केला जातो. या दोन्ही प्रतवारींतील चिकूला फारसा दर मिळत नाही.

* चिकू उत्पादनाचा खर्च वाढल्याने अनेकदा बागायतदारांना हंगामाव्यतिरिक्त  होणाऱ्या विक्रीतून केवळ काढणावळ आणि वाहतुकीचा खर्च भागवता येतो.

*  त्यामुळे दुय्यम आणि तिसऱ्या दर्जाच्या चिकूवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थ बनवण्यात येतात.

बीयरचा प्रयोग यशस्वी

चिकूपासून तयार केलेले सरबत थकवा घालवते असे येथील बागायतदारांचे म्हणणे आहे. याचबरोबर ग्राहकांच्या गरजेनुसार चिकूची वाइन बनवून चिकूचे उत्पादनात नावीन्यतेचा केलेला प्रयोग यशस्वी झालेला आहे. त्यापुढे जाऊन हॉटेल हिलजील येथे श्रीकांत सावे यांनी चिकूवर प्रक्रिया करून चिकू बीयर बनवण्याचा प्रयोगदेखील यशस्वी केला आहे.

First Published on September 4, 2018 1:19 am

Web Title: beer fabrication from chikoo powder