ठाणे शहरासह कल्याण डोंबिवलीलाही पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र ठाण्यातीलच जलतरण तलाव पालिकेने बंद केले आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या तरणतलावामधील पाण्याचे शुद्धीकरण करून ते पुन्हा वापरले जाते. ही यंत्रणा बसविण्यासाठी तेथील प्रशासनाकडे दुरदृष्टी होती. मात्र अशी दृष्टी ठाणे महापालिकेकडे नसल्याचे प्रकर्षांने जाणवले आहे. ठाण्यामधील तरणतलावांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील व अनेक उदयोन्मुख जलतरणपटू सरावासाठी येत असतात. विविध स्पर्धा डोळ्यांसमोर असताना त्यांचा सराव बंद झाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

भीषण पाणीटंचाईला सर्वानाच सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे खेळाडू असलो तरी महापालिकेला याबाबतीत मदत करू. मात्र या सगळ्या गोष्टींचा महापालिकेने आधीच विचार करणे गरजेचे होते, असे वाटते. तरणतलाव बंदमुळे खेळाडूंचे नक्कीच नुकसान होणार आहे. जलशुद्धीकरणाचा पर्याय इतर महानगरपालिका क्षेत्रात वापरला जात असताना तो ठाण्यात का वापरला जात नाही? ठाण्यासारख्या ठिकाणी हा पर्याय उपलब्ध नसल्याचे फार वाईट वाटते. पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या पर्यायाचा महापालिकेने जरूर विचार करावा. इतर ठिकाणी होत असलेला पाण्याचा अपव्यय टाळता येईल आणि तरणतलाव खेळाडूंसाठी खुले होतील
– कल्पित सिंग, जलतरण पटू

जलतरण हा व्यायाम प्रकार असून त्यापासून शरीराचा चांगला व्यायाम होऊन सांधेदुखी, पाठदुखीसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. त्यामुळे हा व्यायाम प्रकार बंद होणार नाही याची काळजी महापालिकेनेच घेण्याची गरज आहे. महापालिकेचे तरणतलाव बंद आणि खासगी तरणतलाव खुले अशी विपरीत परिस्थिती सध्या ठाण्यात दिसते हे चुकीचे असून खासगी तरणतलावांना बंदी घालून महापालिकेचे तरणतलाव सुरू कसे राहतील हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे सगळ्या जलतरणपटूंना त्याचा लाभ घेता येईल.
– मीनल पटवर्धन, जलतरण प्रशिक्षक

पाणी नाही हे जरी मान्य असले तरी बंद केलेल्या तरणतलावामुळे जलतरणपटूंचा सराव थांबवणे योग्य नाही. ठाणे जिल्ह्य़ातील जलतरणपटू हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहेत. शिवाय पोहून आल्यानंतर क्लोरिन काढण्यासाठी आंघोळ करावी लागते. त्यामुळे ही आंघोळ प्रत्येकाने घरी जाऊन करावी म्हणजे पाण्याचा जास्त प्रमाणात होणारा वापर टाळता येईल. तसेच खासगी तरणतलाव चालू आहेत, त्यामुळे चांगल्या घरातील मुलांना सराव करणे शक्य आहे. परंतु जे खेळाडू भरमसाट पैसे भरू शकत नाहीत त्या मुलांचे काय हा विचार पालिकेने करणे गरजेचे असून, त्यावर उपाय योजना राबविता येतील.
– निदीश मापसेकर, जलतरणपटू

पोहण्याचा सराव हा दररोज करावा लागतो. महापालिकेने बोअरवेलच्या पर्यायाचा विचार पूर्वीच करणे गरजेचे होते. पुढच्या महिन्यातच राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेची निवड चाचणी करावयाची होती मात्र ही स्पर्धा घेणे आता शक्य नाही. पिण्यासाठी पाणी असणे अतिशय गरजेचे आहे, परंतु तरणतलावातील पाणी महिन्यातून एकदा बदलणे यांसारखे अनेक पर्याय महापालिकेसमोर उपलब्ध असताना खेळाडूंचा पूर्णत: सराव थांबवणे चुकीचे आहे. पोहून झाल्यानंतर शॉवर घेण्यासाठीही पर्याय बंद करता येऊ शकतो. यावर खेळाडूंनी जमिनीवरील व्यायाम करणे या एका पर्यायाचा खेळाडूंनी जरूर वापर करावा.
– किशोर गुप्ते, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना अधिकारी

तरणतलावाचे पाणी जास्तीत जास्त काळ वापरता यावे या उद्देशाने तरणतलावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येते. कल्याण-डोंबिवली महापालिकेने तशी व्यवस्था केल्याने तेथे चार महिने पाणी वापरणे शक्य होणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच जलतरणपटूना नियमित सराव करणे शक्य होणार आहे. पाणी कमी असो अथवा जास्त त्याचा वापर नेहमीच योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. जलतरण हा केवळ हौस म्हणून करण्याचा प्रकार नसून क्रीडा क्षेत्राला फायदेशीर ठरणारे चांगले जलतरणपटू यातून घडत असतात. त्यामुळे त्यांचा सराव बंद होणार नाही यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करणे योग्य ठरते.
– नितू राजे, जलतरणपटूचे पालक