News Flash

स्थानकात भिकारी, गर्दुल्ल्यांचा मुक्काम

स्थानक परिसरालाच आपले घर मानणाऱ्या भिकाऱ्यांमुळे परिसराला बकाल स्वरूप आलेले दिसत आहे.

ठाणे, कळवा, दिवा, कोपर, डोंबिवलीत प्रवासी हैराण

नियमितरीत्या लाखोंच्या संख्येने प्रवाशांनी वेढलेल्या रेल्वे स्थानकात भिकारी आणि गर्दुल्ल्यांनी ठाण मांडले असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत आहे. ठाणे, कळवा, दिवा, कोपर, डोंबिवली यांसारख्या रेल्वेस्थानकांच्या आवारात फलाट, रेल्वे पूल या ठिकाणी भिकारी, गर्दुल्ल्यांनी हक्काच्या घरासारखे बस्तान मांडले आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून या भिकारी-गर्दुल्ल्यांची वारंवार हकालपट्टी करण्यात येत असली तरी त्याची भीती न बाळगता बेफिकिरीने भिकाऱ्यांनी स्थानक परिसर काबीज केला आहे. ऐन गर्दीच्या वेळी पुलावर मध्यभागीच बसलेल्या भिकाऱ्यांमधून वाट काढताना प्रवाशांच्या अक्षरश: नाकीनऊ येत आहे.

ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनलगत असलेल्या तिकीट घराच्या आवारात भिकारी आणि गर्दुल्ल्यांचे कायमच वास्तव्य असते. स्थानक परिसरालाच आपले घर मानणाऱ्या भिकाऱ्यांमुळे परिसराला बकाल स्वरूप आलेले दिसत आहे. सकाळी आणि सायंकाळी तिकीट घराजवळ प्रवाशांच्या रांगा लागलेल्या असतानाच या ठिकाणीच बसून रांगेतील प्रवाशांकडून भीक मागणे हे येथील भिकाऱ्यांचे उत्पन्नाचेच साधन बनले आहे. दिवस-रात्र ठाणे स्थानक परिसरात वास्तव्य असलेल्या भिकाऱ्यांमुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या तिकीट घराजवळ अस्वच्छतेला प्रवाशांना सामोरे जावे लागते. तिकीट घराजवळच खाणे, लहान मुलांना लघुशंकेसाठी बसवणे असे गैरकृत्य भिकाऱ्यांमार्फत सर्रास होत असले तरी रेल्वे प्रशासनाकडून मात्र याकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसत आहे. रात्री उशिरा रेल्वे स्थानकातून प्रवास करताना या ठिकाणी असणाऱ्या गर्दुल्ल्यांची भीती वाटते असे काही महिलांनी सांगितले. ठाणे स्थानकासोबतच मुंब्रा, दिवा या स्थानकांत सारखीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी कल्याण स्थानकात होत असली तरी या स्थानकातील भिकाऱ्यांनी फलाटालाच आपले घर मानले आहे. एक आणि सात क्रमांकाच्या फलाटांवर अशी परिस्थिती दिसून येते. स्थानकावर बेशुद्ध अवस्थेत पडणे व कोणत्याही डब्यात चढण्याच्या प्रकारामुळे विशेषत प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानक परिसरात फलाटावर खाद्यपदार्थाची दुकाने आहेत. प्रवासीही भिकाऱ्यांना येता-जाता खाद्यपदार्थ पुरवत असतात. खाण्याची सोय होत असल्याने गर्दुल्यांचा वावर या परिसरात अधिक आढळून येतो. स्थानकात कार्य करीत असणाऱ्या रेल्वे पोलिसांकडून भिकारी-गर्दुल्यांची वारंवार हकालपट्टी केली जाते.

सचिन भालोदे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 3:21 am

Web Title: beggar issue in central railway station
Next Stories
1 गुणवंतांच्या पंखांना आर्थिक मदतीचे बळ हवे..
2 चकमकफेम प्रदीप शर्मा यांची ठाणे क्राईम ब्रॅंचमध्ये नियुक्ती
3 ठाण्यातील बाजारपेठेत शिरला आठ फुटांचा अजगर; नागरिकांची पळापळ
Just Now!
X