X

शहर शेती : बगिच्याचे सजीव कुंपण

आपल्या आवाराचे, आतील मालमत्तेचे संरक्षण व वेगळेपण जपण्याच्या दृष्टीने पूर्वापार सजीव अथवा निर्जीव घटकांचा वापर करून आपल्या हद्दीवर भिंतीसारखी रचना करीत आलो आहोत.

आपल्या आवाराचे, आतील मालमत्तेचे संरक्षण व वेगळेपण जपण्याच्या दृष्टीने पूर्वापार सजीव अथवा निर्जीव घटकांचा वापर करून आपल्या हद्दीवर भिंतीसारखी रचना करीत आलो आहोत. आज आपण आवाराचे संरक्षण करण्यासाठी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार व कोणापासून संरक्षण करावयाचे आहे, त्यानुसार विविध पर्यायांतून आपले कुंपण करू शकतो. कुंपणाचे अनेक प्रकार आहेत. सजीव कुंपणामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर कुंपणासाठी केला जातो. निर्जीव कुंपणामध्ये दगडी भिंत, विटांची भिंत, चेनलिंकसारखे जाळीचे कुंपण, काटेरी तारेचे कुंपण व आधुनिक सौर कुंपण.

वनासारखी फार मोठी जागा असल्यास तेथे मोठे खोल व रुंद चर खणून जागेचे संरक्षण केले जाते. यामुळे गुरांपासून तसेच वणव्याच्या आगीपासून संरक्षण मिळते. पूर्वापार निवडुंग, काटेरी झुडपे, मोठे वृक्ष व मधे झुडपे अशी रचना करून आपली हद्द व आतील जागेचे संरक्षण करीत. कुंपणाची झाडे निवडताना त्यांची वाढ, काटेरी प्रकार व ज्याला बकरीसुद्धा तोंड लावत नाही अशा प्रकारच्या झाडांची निवड केली जाते.

असे कुंपण करताना प्रामुख्याने सभोवती जागा किती आहे, आसपास माणसांचा, लहान मुलांचा वावर किती आहे याचा विचार करून आपण झाडे लावू शकतो. या झाडांपासून संरक्षण, सौंदर्य, औषधं, सुगंध असे अनेक घटक आपण मिळवू शकतो.

सजीव कुंपणासाठी सागरगोटा, शिकेकाई यांसारख्या काटेरी झुडूप स्वरूपात वाढणाऱ्या वेली लावतात. यांचे काटे उलटे असतात. त्यामुळे एखादा काटा रुतला व ओढला गेला तर अजूनच रुततो. यांच्या पानांच्या मागे, देठावर, खोडावर सर्वत्र काटे असतात. ही झुडपे आडवी पसरतात. आधार मिळाला तर झाडाच्या उंचीप्रमाणे उंच जातात. अगदी ३० फुटांपर्यंत उंची गेलेली पाहण्यात आली आहे. आडवे पसरण्याच्या गुणधर्मामुळे मोठी जागा असल्यास त्याची लागवड कुंपणाला करतात. यापासून औषध म्हणून सागरगोटा व वापरासाठी शिकेकाई मिळते.

चारधारी निवडुंग : काही भागात यास टेपरा, पेरकुट, सावरदांड असेसुद्धा म्हणतात. हे निवडुंग उभे-आडवे वाढतात. ८ ते १० फूट उंचीपर्यंत वाढते. यांचे छान घट्ट कुंपण होते. वणवा लागून त्याची धग लागल्यास ते मरू शकते.

यानंतर आपल्याकडे मेंदी व कडू मेंदी (कडू कोयनेल) हे कुंपणासाठी वापरतात. यांना बकरीसुद्धा खात नाही. घट्ट वाढते. आपण या कुंपणास छाटणी करून पाहिजे तसा आकार देऊ शकतो. हे कुंपण भराभर वाढते. मेंदी उभी वाढते, तर कडू मेंदी उभी-आडवी वाढते. या कडू मेंदीच्या पांढऱ्या, लांब बारीक फुलांवर बऱ्याच प्रकारची फुलपाखरे येतात. यास काटे नसतात, पण दाट वाढ होते. एकात एक फांद्या गेल्यामुळे याची जवळ जवळ जाळीच तयार होते. सहसा यातून आत कोणी गुरे येऊ शकत नाहीत. या कडू मेंदीला सारखी छाटणी करून आकार नियंत्रित करावा लागतो.

पूर्वी हँगिंग गार्डनमध्ये जे वनस्पतीचे वेगवेगळे आकार तयार केले होते. त्यात लोखंडी सांगाडय़ावर ही कडू मेंदी वाढवीत व योग्य छाटणी करून विविध आकार देऊन वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार येत. त्यानंतर डिडोनिया नावाच्या वनस्पतीची लागवड कुंपणासाठी करू लागले. हा डिडोनिया कोरडय़ा व कमी पावसाच्या भागात चांगला वाढतो. कोकणात दमट हवा असल्यामुळे इथे त्याची वाढ होत नाही. यापासून उभी हिरवी भिंत चांगली तयार होते. तसेच कुंती किंवा कामिनी नावाची वनस्पती कुंपणासाठी लागवड करतात. याची वाढ हळूहळू होते. याची पाने कढीलिंबासारखी असतात. थाई फूडमध्ये या पानांचा वापर होतो. पानांचा विशिष्ट वास येतो. कामिनीला वर्षांतून तीन-चार वेळा पांढरी नाजूक फुले झुपक्याने येतात व ती सुगंधी असतात. प्रत्येक फुलाचा सुगंध कमी असला तरी झाड पांढऱ्या फुलांना बहरल्यावर आसमंतात मादक सुगंध पसरतो. हा सुगंध वाऱ्याबरोबर १०० ते १५० फुटांच्या परिसरात पसरतो. याच्या पानांना बकरी किंवा गुरे खात नाहीत. याच्या कुंपणात पक्ष्यांना घरटी करण्यास जागा सहज मिळू शकते. तसेच याची चकचकीत गडद हिरवी तजेलदार व टिकाऊ पाने फुलांच्या सजावटीमध्ये, पुष्पगुच्छांमध्ये फिलर म्हणून वापरतात.

आजकाल कुंपण प्रामुख्याने तारांचे, जाळीचे किंवा भिंतीचे असते. त्यामुळे कुंपणासाठी वनस्पतींचा वापर कमी होतो. निर्जीव कुंपण नजरेला सुख देत नाही. यासाठी यांच्याजवळ आपण कुंतीसारखी वातावरण सुगंधित करणारी व नजरेला हिरव्या रंगाची सुख देणारी वनस्पती लावली तर छान वाटते. या कुंतीच्या झुडपाला काही ठिकाणी पांढरीचे झाड असे म्हणतात. याची काठी जवळ ठेवल्यास भूतबाधा होत नाही. तसेच या काठीच्या प्रभावक्षेत्रात साप येत नाहीत, अशी पूर्वापार श्रद्धा आहे. ही काठी जड असते. ती पाण्यात बुडते. जी अमावास्या शनिवारी येते त्या वेळेस ही काठी तोडली तर त्याचा चांगला उपयोग होतो, अशी भावना सर्वत्र विशेषत: सह्य़ाद्रीच्या भागात आहे.

कोकणात अनेक ठिकाणी गिरीपुष्प व जास्वंदीचे प्रकार कुंपणासाठी लावतात. त्यास आडवी काठी, बांबू बांधून त्यांची ताटी (भिंत) तयार करतात. दर पावसाळ्याच्या सुरुवातीला ही वई, ताटी नीट करतात. गिरीपुष्पाच्या फांद्यांची छाटणी करून त्या फांद्या व पाने खत म्हणून बागेतील झाडांना घालतात. तो युरियासाठी पर्याय आहे, तर जास्वंदीची फुले देवपूजेसाठी वापरतात व त्यापासून सुंदर तसेच सुगंधित फूल मिळवू शकता. छान फुलणाऱ्या वेलांमध्ये प्रामुख्याने बोगनवेल मोठय़ा प्रमाणात कुंपणावर लावतात. त्यांचे अनेक रंग असतात. जाई, जुई, कृष्णकमळ, संक्रांत वेल, लसूण वेल (पानाला लसणासारखा वास येतो) अशा अनेक प्रकारच्या सुगंध व सुंदर फुले येणाऱ्या वेली लावू शकतो.

आवारातील बागेत, लॉनच्या बॉर्डरला, लॅण्डस्केपमध्ये व जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी डय़ुरांडा, कोलियस यांचे अनेक प्रकार लावू शकतो. गोल्डन डय़ुरांडाच्या अनेक जाती आहेत. हे कुंपणाजवळ लावले तर आपण ती उंच वाढवू शकतो, तर दोन क्षेत्रांची विभागणी करताना वनस्पतींची योग्य छाटणी करून वेगवेगळे आकार व रंगसंगती करून शोभा वाढवू शकतो.

गोल्डन डय़ुरांडाला पाण्याची गरज कमी असते. त्याच्यावर सावली आल्यास गोल्डन कलर येत नाही. याचबरोबर आपण हेजसाठी टणटणी, घाणेरी (लॅन्टेना)चे अनेक प्रकार व रंग लावू शकतो.शक्य तेथे कुंपणाला बॉर्डर (हेज) म्हणून वेगवेगळ्या वनस्पतींची तसेच मध्य उंचीच्या वृक्षांची लागवड करून आपले आवार सुंदर व सुगंधित करू या.

  • Tags: living-fence, planting, plants-on-fences,
  • Outbrain

    Show comments