या वर्षी नव्याने झाडं लावण्याचा किंवा घरी आहेत त्यात भर घालण्याचा निर्णय ज्यांनी घेतलाय त्या सर्वाचे मन:पूर्वक अभिनंदन. ‘बागकाम’ हा असा छंद आहे की घरातल्या एका व्यक्तीने जरी जोपासला तरी त्याचा फायदा घरातल्या सर्वाना नकळत होतो.
निसर्गाबद्दल ओढ असणाऱ्यांमध्ये निसर्गातल्या कोणत्या गोष्टी जास्त भावतात, यामध्ये व्यक्तीनुसार फरक पडतो. कुणाला निसर्गातील दऱ्या आणि डोंगर तर कुणाला नद्या आणि समुद्र, कुणाला आकाश आणि तारे, कुणाला पाने आणि फुले, कुणाला पशू आणि पक्षी तर कुणाला फुलपाखरे आवडतात. निसर्गातला जो घटक आपल्याला जास्त भावतो, त्याप्रमाणे आपण छंद जोपासतो आणि निसर्गाच्या त्या घटकाचा जास्तीत जास्त आस्वाद घेतो. ‘बागकाम’ हा असाच एक छंद निसर्ग सान्निध्यात रमण्याचा.
बागकामाचा छंद अनेक दृष्टीने उपयोगी आहे :
’घरच्या घरी निसर्ग सान्निध्याचा आनंद घेता येतो.
’झाडामध्ये नैसर्गिकरीत्या होणारे बदल रोज काही तरी नवीन दाखवीत असतात.
’प्राणवायू बाहेर सोडणाऱ्या यंत्राशीच संबंध आल्याने शुद्ध हवेचा लाभ.
’हिरवा रंग डोळ्यांना शांत करणारा रंग आहे.
’आपलं घर/ कार्यालय किंवा जे काही लोकेशन असेल ते नैसर्गिकरीत्याच सुशोभित होतं.
याशिवाय झाडं आणखीन बरीच मदत आपल्या आरोग्यासाठी करतात. त्यामुळं त्यांचं -झाडांचं- आपल्या अवतीभवती असणं अतिशय गरजेचं आहे. ताणतणाव आणि प्रदूषण ही आरोग्यहानीची दोन मुख्य कारणे आहेत. रस्त्यांवरच्या प्रदूषणाविषयी खूप बोलबाला होतो, पण बंदिस्त जागेतील- उदा. घर, कार्यालय, रुग्णालय, सिनेमाघर, विमाने इ. ठिकाणी हवा किती शुद्ध आहे (इनडोअर एअर क्वॉलिटी) याविषयी फार कमी जागरूकता आहे. बऱ्याच जणांचा जास्त वेळ बंदिस्त जागेतच जातो.
बंदिस्त जागेतील (आतील) हवेत प्रदूषित करणारे बरेच घटक आहेत. जेव्हा आतील हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, तेव्हा मरगळ वाढते आणि कामाकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. अर्थातच त्यामुळे काम नीट होत नाही. अशा बंदिस्त जागांमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यास कुंडीतील झाडे खूप मदत करतात. प्रकाशाच्या मदतीने होणाऱ्या ‘फोटोसिन्थेसिस’ या प्रक्रियेत झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड वापरतात आणि प्राणवायू बाहेर सोडतात. काही झाडे रात्रीसुद्धा हवेतील कार्बन डायऑक्साइड वापरतात आणि हवा शुद्ध करतात. अशी झाडे आपण बेडरूममध्येसुद्धा ठेवू शकतो. ‘सक्युलन्ट’ प्रकारची झाडे रात्री हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतात. ‘सक्युलन्ट’ प्रकार म्हणजे यांची पाने जाड असतात आणि या झाडांना कमी पाणी लागतं. उदा. स्नेक प्लॅन्ट किंवा मदर इन लॉज टंग हे आपल्याकडे सर्रास आढळणारं झाड. हवेतील कार्बन डायऑक्साइड कमी करण्यासाठी ही झाडे जी प्रक्रिया करतात त्याला सी.ए.एम. (क्रासुलॅसिअन अ‍ॅसिड मेटॅबॉलिझम) म्हणतात.
कार्बन डायऑक्साइडव्यतिरिक्त आतील हवा दूषित करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे व्ही.ओ.सी. (व्होलॅटाइल ऑरगॅनिक कम्पाऊण्ड्स). यामध्ये अ‍ॅसिटोन, बेन्झिन, फॉरमॅलडिहाइड, टॉल्यूइन, झायलीन, इथिलीन ग्लायकॉल आदींचा समावेश होतो. घरातील विशिष्ट वस्तू आणि बांधकामात वापरलेल्या गोष्टींमधून यांचे उत्सर्जन होते. उदा. भिंतींचे रंग, पॉलिश, वेगवेगळी फिटिंग्ज, कॉम्पोझिट वुडचे फर्निचर, व्हिनाइल शिट्स, एअर फ्रेशनर्स, सफाईची तसेच जंतूनाशक केमिकल्स इ. भिंतींचा रंग जेव्हा नवीन असतो, तेव्हा आपल्याला ही दूषित हवा प्रकर्षांने जाणवते आणि रंगाचा वास येतोय असं म्हणून आपण दुर्लक्ष करतो. एखादा दिवस बंद असलेली कार उघडून लगेच आतल्या हवेत श्वास घेतला तरी व्ही.ओ.सी.मुळे दूषित झालेली हवा जाणवते.
अमेरिकेतील नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी यांनी केलेल्या संशोधनातून असं दिसून आलंय की, कुंडीतील झाडांमुळे हवेतील व्ही.ओ.सी.चं प्रमाण खूपच कमी येतं आणि हवा नैसर्गिकरीत्या शुद्ध राहते. हवेतील व्होलॅटाइल ऑरगॅनिक कम्पाऊण्ड्स कमी करण्यासाठी अरेका पाम, पीस लिली, मनी प्लान्ट तसेच ड्रेसेना डेरेमेन्सिस ही झाडे उपयोगी आहेत.
drnandini.bondale@gmail.com