मोदकांपेक्षा आकर्षक रंगसंगती व चवींच्या मिठायांना अधिक पसंती

गणपतीचा आवडता खाद्यपदार्थ मोदक असल्याची परंपरा असली तरी सध्या लंबोदराला भक्ताने मनोभावे दिलेल्या बंगाली मिठायांच्या नैवेद्यावरच भूक भागवावी लागत आहे. मराठमोळय़ा वातावरणात गणरायाची आराधना करताना नैवेद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठायांचा वापर करण्याचे प्रमाण यंदाच्या गणेशोत्सवात वाढले आहे.आकर्षक रंगांत मिळणाऱ्या या चवीष्ट मिठाया केवळ नैवेद्य म्हणूनच नव्हे तर गणरायाच्या भोवती मांडण्यात येणारी आरास अधिक सुशोभित करण्यासाठीदेखील वापरल्या जात आहेत. त्यामुळे या मिठायांमध्ये कलिंगडापासून स्ट्रॉबेरीपर्यंत आणि वाद्य वाजवणाऱ्या उंदरापासून राजहंसापर्यंत विविध रूपे येऊ लागली आहेत. भक्तांकडून मागणी वाढत असल्याने बंगाली मिठायांचे दरही वाढल्याचे दिसून आले आहे.

मोदक हे गणपतीचे आवडते खाद्य असल्याने दरवर्षी गणेशोत्सवात मराठमोळय़ा घरांमध्ये उकडीचे किंवा तळणीचे मोदक बनवले जातात. अलीकडच्या काळात बाजारात तयार मोदक मिळू लागले असून चॉकलेक, मावा, सुकामेवा अशा विविध पदार्थानी बनलेल्या मोदकांचीही रेलचेल दिसून येते. मात्र, या जोडीलाच बंगाली मिठाया आता ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. अतिशय स्वादिष्ट असलेल्या या मिठाया गणरायासमोर नैवेद्य म्हणून ठेवताना त्यांच्या रंगसंगतीचाही विचार केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मिठायांचे रंग आणि आकार यामध्ये वैविध्य आले आहे. मोदकांसोबतच खोब्रावडी, काजुकतली, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, कंदी पेढे यातही विविध प्रकारचे पेढे उपलब्ध असून या मिठाईलाही ग्राहकांची पसंती आहे. मिरगुंड, पोहापापड, करंजी, अनारसे, शंकरपाळी, पुरणपोळी, चकली आदी पदार्थ गौरीसाठी नैवेद्य म्हणून ग्राहक खरेदी करतात.

मलई, गुलकंदांचे मोदक

मोदकांमध्ये उकडीच्या व तळणीच्या मोदकांप्रमाणेच यंदा स्पेशल केशरी मावा मोदक, स्पेशल ड्रायफ्रुट मोदक, स्पेशल काजू मोदक, स्पेशल अंजिर किंवा बटरस्कॉच मोदक, स्पेशल कंदी मावा मोदक आदी प्रकार विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. ४०० ते ८०० रुपये किलो दराने ते बाजारात उपलब्ध आहेत. मलाई मोदकांमध्ये पिस्ता, स्टॉबेरी, अंजीर, रोझ हे मोदक उपलब्ध असून ते ५०० ते ६०० रुपये किलो दराने मिळत आहेत. काजू मोदकांमध्ये काजूसोबत केशर, केवडा, गुलाब, खस यांचे अर्क मिसळलेले आहेत. हे मोदक ८०० ते १००० रुपये किलो दराने बाजारात मिळत आहेत. काजू, गुलाब, गुलकंद यांचे मिश्रण असलेला मोदक, मलई कुल्फी मोदक हेही नवीन प्रकार पाहायला मिळत आहेत.

मिठायांच्या किंमतीत २० टक्क्यांची वाढ

साखर आणि गुळाच्या किमतीत वाढ झाल्याने तसेच वाहतुकीचा खर्च यामुळे यंदा मिठाईच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती कल्याणमधील विक्रेते राजन साप्ते यांनी दिली. जुनी पिढी अद्यापही उकडीच्या मोदकांना पसंती देत असली तरी नव्या पिढीला वेगळे काहीतरी हवे असते. मागणीनुसार हे वेगवेगळ्या प्रकारचे आणि चवीचे मोदक यंदा तयार करण्यात आल्याचे विक्रेते श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले. पाच किंवा दहा दिवस गणपती असतात तेव्हा दररोज वेगवेगळ्या चवीचे मोदक हल्लीच्या तरुणाईला हवे आहेत. त्यामुळे तशा स्वरूपाची मागणी आमच्याकडे असल्याचे ते सांगतात. चॉकलेट मोदकांनाही भाविकांची पसंती आहे. खासकरून लहान मुलांना देण्यासाठी स्पेशल चॉकलेट मोदक मागविले जात असल्याचे महेश बानकर यांनी सांगितले.